सुपरनोव्हाचा ‘सुपर’ विजय

वुमेन्स टी-२० चॅलेंज : पूजा वस्त्राकारचा भेदक मारा


23rd May 2022, 11:42 pm
सुपरनोव्हाचा ‘सुपर’ विजय

पूजा वस्त्राकार

पुणे : वुमेन्स टी-२० चॅलेंज स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाजने स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझरचा ४९ धावांनी पराभव केला. सुपरनोव्हाजने ठेवलेल्या १६४ धावांचा पाठलाग करणाऱ्या ट्रेलब्लेझरला २० षटकांत ९ बाद ११४ धावांपर्यंतच मजल मारता आली. सुपरनोव्हाजकडून पूजा वस्त्राकारने भेदक मारा करत १२ धावांत ४ बळी टिपले. तर फलंदाजीत कर्णधार हरमनप्रीतने ३७ धावांची खेळी केली. ट्रेलब्लेझरकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तर गोलंदाजीत हेली मॅथ्यूजने ३ बळी घेतले.
‍‍सुपरनोव्हाजने ठेवलेल्या १६४ धावांचा पाठलाग करतानाचा ट्रेलब्लेझरनेही चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. हेली मॅथ्यूज आणि स्मृती मानधना यांनी ३९ धावांची सलामी दिली. मात्र, पूजा वस्त्राकारने हेलीला १८ धावांवर बाद करत ट्रेलब्लेझरला पहिला धक्का दिला. त्यानंतर स्मृती मानधनाही २३ चेंडूत ३४ धावांची खेळी करून माघरी परतली.
स्मृती बाद झाल्यानंतर ट्रेलब्लेझरचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सुनपरनोव्हाची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकारने भेदक मारा करत एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी धाडण्यास सुरुवात केली. तिने चार षटकांत १२ धावा देत ४ बळी टिपले. त्यामुळे ट्रेलब्लेझरनची अवस्था २ बाद ६३ धावांवरून ७ बाद ७७ अशी झाली. दरम्यान, जेमिमाह रॉड्रिग्जने एक बाजू लावून धरली होती. मात्र, दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज तग धरू शकत नव्हती.
तत्पूर्वी, वुमेन्स टी-२० चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोव्हाजच्या सलामीवीर प्रिया पुनिया आणि डिएन्द्रा डॉटिन यांनी पाच षटकात ५० धावांची दमदार सलामी देत ट्रेलब्लेझरच्या गोलंदाजांची पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केली. मात्र, सुपरनोव्हाजला दमदार सुरुवात करून देणारी डॉटिनला रेणुका सिंहने ३२ धावांवर धावबाद केले. त्यानंतर हेयले मॅथ्यूजने सुपरनोव्हाजच्या २० चेंडूत २२ धावा करणाऱ्या प्रिया पुनियाचा त्रिफळा उडवला. या पडझडीनंतर हर्लीन देओल आणि हरमनप्रीत कौरने सुपरनोव्हाचा डाव सावरत शतकी मजल मारून दिली.
दरम्यान, १९ चेंडूत ३५ धावांची खेळी करणाऱ्या हरलीने देओलला सलमा खातूनने बाद केले. यानंतर हरमनप्रीतने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र, दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत होत्या. राजेश्वरी गायकवाडने सनी लूसला १० धावांवर, सलमा खातूनने अॅना किंग्जला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या पूजा वस्त्राकारने १४ धावांची भर घातली. मात्र, तिला पूनम यादवने बाद करत सुपरनोव्हाला सहावा धक्का दिला.
कर्णधार हरमनप्रीत कौरने २९ चेंडूत ३७ धावांची खेळी करत संघाला १५० चा टप्पा पार करून दिला. मात्र, ती धावबाद झाली अन् सुपरनोव्हाजच्या धावगतीला ब्रेक लागला. मॅथ्यूज सोफी इकलस्टोनला ५ धावांवर बाद झाली, तर मेघना सिंग देखील २ धावा करून धावबाद झाली. अखेर मॅथ्यूजने व्ही चंदूला पायचित करत सुपरनोव्हाचा डाव १६३ धावांत संपवला.

संक्षिप्त धावफलक
सुपरनोव्हाज : २० षटकांत सर्वबाद १६३ धावा.
ट्रेलब्लेझर :२० षटकांत ९ बाद ११४ धावा.