लाच मागणाऱ्यांची तक्रार करा, कडक कारवाई !

सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचे कंत्राटदारांना आवाहन


23rd May 2022, 12:43 am
लाच मागणाऱ्यांची तक्रार करा, कडक कारवाई !

प्रतिनिधी। गाेवन वार्ता                  

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटादारांना लाच द्यावी लागत असेल तर त्यांनी त्याची माहिती मला द्यावी. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल. कंत्राटदारांनीही रस्त्याच्या कामात निष्काळजीपणा केला तर त्यांना  काळ्या यादीत टाकले जाईल. यापुढे कंत्राटदार व अभियंत्यांकडून रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी बजावले.                    

मंत्री काब्राल पुढे म्हणाले, यापूर्वी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे तीन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून दोघांना इशारा देण्यात आला आहे. कंत्राटदारांना सरकारकडून  पूर्ण पैसे दिले जातात, तरीही ते पैसे कमी पडत असल्याचा अाराेप करतात. ‘कंत्राट घेण्यासाठी लाच द्यावी ​लागते’, असे काही कंत्राटदार सांगतात. त्यांनी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची रितसर तक्रार करावी. त्यांच्यावर कडक कारवाई हाेईल. कंत्राटदारांनीही रस्त्याचे काम चांगले केले पाहिजे. त्यांना कामासाठी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अडथळा येत असेल तर त्यांनी आपल्याकडे तक्रार करावी, असेही मंत्री काब्राल म्हणाले.                   

 यापूर्वी पावसात खड्डे बुजाविण्याचे मशिन उपलब्ध नव्हते. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नवीन मशिन आणण्याचा  आमचा विचार आहे.   कोल्ड प्रेस आणि हॉट प्रेस अशी दोन प्रकारची मशिन आहेत. अलिकडे वर्षभर कधीही पाऊस पडत असल्याने अशा मशिनची गरज आहे. या मशिनची एका जागी महिनाभर  चाचणी करण्यात येईल.  यशस्वी झाल्यास  त्याचा वापर इतरत्र केला जाणार आहे, असेही मंत्री काब्राल यांनी स्पष्ट केले.

पावसामुळे रस्त्यांच्या कामात अडथळा

मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा ताबा घेतल्यावर लगेच कामाला सुरुवात केली आहे. रस्ते दुरुस्ती व बांधण्याच्या निविदा काढून त्याचे कामही सुरू झाले आहे. अचानक पाऊस आल्याने काही कामे अर्धवट राहिली आहेत.  राज्यातील काही रस्त्यावर डांबर घालण्याचे काम सुरू होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने डांबर घालता आले नाही. राज्यातील सर्व खड्डे बुजविण्याचा प्रयत्न आहे. महत्त्वाच्या रस्त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आम्ही  १०० टक्के खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारकडून काम सुरू आहे. विराेधक मात्र विरोधासाठी टीका करत आहेत, असेही यावेळी मंत्री काब्राल यांनी सांगितले.                                    


हेही वाचा