मुख्याधिकाऱ्यांची वारंवार बदली हा विकासात अडसर

Story: अंतरंग | अजय लाड |
23rd May 2022, 12:26 am

मडगाव नगरपालिकेतील मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांची केवळ १९ महिन्यांत बदली करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी रोहित कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्याधिकार्यांच्या बदल्यांमुळे प्रकल्प मार्गी लागण्याचे काम जैसे थे राहत आहे. गेल्या १५ वर्षात ४८ पेक्षा जास्त मुख्याधिकारी मडगाव पालिकेला लाभलेले आहेत.     प्रत्येक वर्षभराच्या किंवा दीड वर्षांच्या कालावधीने मडगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची काही ना काही विषयावरून बदली होत आली आहे. गेल्या पंधरा वर्षांत  ४८ पेक्षा जास्त मुख्याधिकारी मडगाव पालिकेला लाभलेले आहेत. मात्र पालिकेचे प्रकल्प मार्गी लागण्याचे काहीही काम झालेच नसल्याने सर्व आश्वासने व नियोजने केवळ कागदोपत्री राहिलेल्या आहेत. सोनसडो कचरा प्रकल्प हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यातील प्रश्न असल्याने, यावर केवळ राजकारणच झालेले मडगावकारांनी बघितले आहे. पालिकेत सत्ता गाजवणारे आमदार असो,  मुख्याधिकारी असो किंवा नगराध्यक्ष यापैकी कुणालाही सोनसडोवरील कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य झाले नाही. परिणामी राजकीय भोवऱ्यात अडकलेली सोनसडोची समस्या नागरिकांसाठी नाकात दम करत आहे. जिल्हाधिकारीपदी काम केलेले राज्य सरकारच्या सेवेतील अनुभवी अधिकारी एन. डी. अगरवाल असो किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी काम केलेले यशवंत तावडे असो, राज्य सरकारने अ श्रेणी प्राप्त असलेल्या मडगाव नगरपालिकेला नेहमीच योग्य मुख्याधिकारी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र  इतर खात्यांत सुशासन देणाऱ्या अधिकाऱ्यांना पालिकेत  स्वतःची यशस्वी कारकिर्द राबवता आली नाही. 

ऑगस्ट २००६ साली पलिकेवळ यशवंत तावडे यांची मुख्याधिकारीपदी नेमणूक झाली होती. त्यांच्या नियुक्तीच्या अवघ्या दहा महिन्यानंतर मे २००७ साली नारायण सावंत यांनी पालिकेचे २३ वे मुख्याधिकारी म्हणून ताबा घेतला. ते केवळ अडीच महिने मुख्याधिकारी पदावर राहिले. यशवंत तावडे सोडता कोणताही अधिकारी पालिकेवर सलग दोन वर्षे राहू शकला नाही, ही मडगाव पालिकेची शोकांकिता आहे. पलिकेवर नियुक्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांची पार्श्वभूमी पाहता आतापर्यंत यशवंत तावडे,एन डी अगरवाल, खाण संचालक राहिलेले प्रसन्न आचार्य, निवृत्त सनदी अधिकारी जे. ब। भिंगी, श्रीनेत कोठावळे, माजी पंचायत संचालक संध्या कामत, दिपाली नाईक,आयएएस अधिकारी नवीन लक्ष्मण, सिद्धिविनायक नाईक अशा अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी म्हणून नेमले आहे.      डिसेंबर २०१९ मध्ये अजित पंचवाडकर हे मुख्यधिकारी पदावर रुजू झाले. पंचवाडकर यांनी नगरसेवकांची व पालिकेतील अन्य कामाची बिले अडवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार होत होता. वर्ष भरापासून न फेडलेली लाखो रूपयांची बिले पालिका मंडळाच्या बैठकीत उपस्थित केली असता, मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी सदर बिले प्रमाणित केली नाहीत त्या अर्थाने बिलांमध्ये घोळ आहे. असे  आरोप भाजप व गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी पंचवाडकर यांच्यावर केले होते. मोठ्या राजकीय घडामोडीनंतर मडगाव नगरपालिकेचे तत्कालीन मुख्यधिकारी अजित पंचवडकर यांची ११ महिन्याने बदली करण्यात आली होती. त्यांच्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांना हा कार्यभार सोपविण्यात आले. पुन्हा पुन्हा मुख्याधिकारी बदलत असल्यामुळे पालिकेच्या कामांना खीळ बसत आहे. राजकीय दबावामुळे मडगाव पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची बदली होत असते पण अशा प्रकारांमुळे अधिकाऱ्यांवर टांगती तलवार राहते. 

आता मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांना १९ महिन्यांनंतर दुसर्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. नव्या मुख्याधिकार्यांना काम समजून घेण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. पालिकेत सध्या कचरा प्रश्न सोडवणे, मान्सूनपूर्व कामांचा प्रश्न, सोपो कर गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करणे, पालिका इमारत दुरुस्ती, बहुमजली पार्कींग प्रकल्प, फाईल्स गहाऴ होणे व महसूल वाढवणे असे प्रश्न कायम आहेत. अशाप्रकारे मुख्याधिकारी बदलीने मडगाव पालिकेचा विकासाची प्रक्रिया रखडत चालली आहे.