कासरपाल गावची देवी कालिका

तिने विचार केला की, ‘येथील पाणी इतके गोड तर माणसे किती गोड असतील आपण येथे स्थायिक झालो तर या गोड माणसांच्या सानिध्यात आनंदाने राहता येईल.’ विचार पक्का करून झटकन ती एका मूर्तीमध्ये स्थानापन्न झाली.

Story: लोकसंस्कृती | पिरोज नाईक |
21st May 2022, 08:37 Hrs
कासरपाल गावची देवी कालिका

पूर्वीच्याकाळी आजच्यासारखे मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने नव्हते. त्यामुळे नोकऱ्याही नव्हत्या. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय भात शेती. शेती बागायतीत कष्टाची कामे करून ते आपला उदरनिर्वाह चालवत असत. काही भटक्या जाती जमातीचे लोक शेतीसाठी लागणारी अवजारे, धातूपासून बनवलेल्या मूर्ती विकून पोट भरत असत. त्यावेळी वाहतुकीची साधने नव्हती बनवलेल्या वस्तू एखाद्या गाठोड्यात बांधून अथवा बांबूच्या टोपलीत भरून डोकीवर घेऊन ते गावोगावी पायी प्रवास करीत. ‘जाय गे जाय गे’ अशा हाका देत हिंडत असत.  हिंडता-फिरता संध्याकाळ झाली तर सामान तिथेच ठेवून एखाद्या झाडाखाली रात्र घालवत. सकाळ होताच पुढील मार्गक्रमण करत. 

 डिचोली तालुक्यातील कासरपाल हा निसर्ग संपन्न गाव. झाडा-झुडपांनी भरलेल्या फुला-फळांनी बहरलेल्या या गावात चिंचा, बोरे, आवळे अशी पुष्कळ रानझाडे होती. असे सांगितले जाते की, एक दिवस असाच एक मूर्ती विकणारा मूर्तिकार धातूपासून बनवलेल्या लहानलहान मूर्ती घेऊन फिरत असताना कासरपालला पोहोचला. संध्याकाळ झाल्यामुळे रात्र येथेच घालवायची असा विचार करुन तिथे जवळच असलेल्या ओढ्याकाठी तो थांबला. तेथे बरीच रानआवळ्याची झाडे होती. आपल्या गाठोड्यातील मूर्ती त्यांनी जमिनीवर काढून ठेवल्या व कपडा जमिनीवर अंथरून तो एका झाडाखाली झोपी गेला.

 त्या वनांमध्ये कालिका मातेचा निवास होता. फिरताफिरता देवी मूर्ती ठेवलेल्या जागेवर पोहोचली. झाडाचा एक आवळा काढून देवीने तोंडात टाकला. ओहळावर जाऊन झऱ्याचे थंडगार पाणी सेवन केले. ते पाणी तिला गोड लागले. आवळा खाल्ल्यामुळे पाणी गोड लागले हे तिच्या ध्यानातही आले नाही. तिने विचार केला की, ‘येथील पाणी इतके गोड तर माणसे किती गोड असतील आपण येथे स्थायिक झालो तर या गोड माणसांच्या सानिध्यात आनंदाने राहता येईल.’ विचार पक्का करून झटकन ती एका मूर्तीमध्ये स्थानापन्न झाली.

 दिवस उजाडला पक्ष्यांच्या किलबिलाटाने मूर्ती विकणाऱ्या त्या माणसाला जाग आली. अंथरलेला कपडा झटकून त्याने गाठोडे भरण्यास सुरुवात केली. त्याला लवकर दुसऱ्या गावात जायचे होते. सगळ्या मूर्ती गाठोड्यात भरल्या पण एक मूर्ती जागची हलेना. मूर्ती एकदम इतकी कशी काय जड झाली असा विचार करून त्याने ती दोन्ही हातांनी ओढायला सुरुवात केली. पण छे, मूर्ती हलतच नव्हती. तो एकदम घामाघूम झाला. पुष्कळ प्रयत्न करूनही मूर्ती ज्यावेळी हलेना त्या वेळी काय करावे ते त्याला सुचेना. भूतबाधा? ब्रह्मसंबंध? दैवी चमत्कार? नक्कीच काहीतरी! मनात असा विचार येताच घाबराघुबरा होऊन गाठोडे तेथेच टाकून त्याने गावात धूम ठोकली व घडलेली हकिकत गावकऱ्यांना कथन केली.

 काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी काही जाणकार वयस्क मंडळी त्याच्याबरोबर तेथे आले. त्या सर्वांनी मूर्ती उचलण्याचा, ओढून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण कोणालाही ते शक्य झाले नाही. शेवटी वैतागून हा काहीतरी दैवी चमत्कारच असावा म्हणून त्यांनी कौल लावला त्या वेळी श्री देवी कालिका मातेने आपल्याला गावात स्थायिक व्हायचे असल्याचे सांगितले.

 कासारपाल हा कासारांचा गाव. स्त्रियांच्या हातात बांगड्या भरण्याचा व्यवसाय करणारे लोक या गावात राहत होते. यावरूनच या गावाला कासरपाल हे नाव पडल्याचे सांगण्यात येते. आपल्याला गावात स्थायिक होण्याची देवीची इच्छा ऐकून गावातील लोकांना खूप आनंद झाला. ग्रामस्थांनी लगेच परिसर स्वच्छ केला तिथे देवीची स्थापना केली व भव्य दिव्य असे मंदिर उभारले. चैत्र शुक्ल तृतीयेच्या दिवशी आवळ भोजनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. या दिवशी देवीला आवडीच्या झाडाखाली पेडावर आणून बसवतात. महानैवेद्याचा कार्यक्रम असतो. श्री देवी कालिका मंदिराच्या जवळच श्री देवी सातेरी भूमिकेचे मंदिर आहे. या मंदिरातून वर्षभर निरनिराळे कार्यक्रम साजरे केले जातात. प्रत्येक महिन्यात वद्य चतुर्दशीच्या दिवशी श्री कालिका मातेची मूर्ती पालखीत बसवून मंदिर परिसरातून देवीची मिरवणूक काढली जाते. नवरात्रोत्सव, शिमगोत्सव साजरा केला जातो. फाल्गुन वद्य त्रयोदशीपासून शिमगोत्सवाची सुरुवात होते. या दिवशी देवी जत्रेचे निमंत्रण देण्यासाठी आपली बहीण श्री सातेरी-भूमिका देवीकडे जाते. तिथे पूजा आरती असे विधिवत धार्मिक कार्यक्रम झाल्यावर पुन्हा मंदिरात येते. यावेळी दारूकामाची आतषबाजी होते. दुसऱ्या दिवशी पालखी मिरवणूक, नाटक तर तिसऱ्या दिवशी रथातून मिरवणूक व चौथ्या दिवशी अंबारीतून मिरवणूक असते.

 गुढीपाडव्याच्या दिवशी श्री सातेरी देवीचा कळसोत्सव साजरा केला जातो. देवी गावात फिरून प्रत्येक घराला भेट देते. घराघरातून पूजाअर्चा करुन देवीचे स्वागत करतात. सुवासिनी देवीची खणा-नारळाने ओटी भरतात शिवाय दिवजोत्सव, कालोत्सव, घोडेमोडणी इत्यादी उत्सव येथे साजरे केले जातात.