रॉयल राजस्थान प्लेऑफमध्ये

चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव : रविचंद्रन अश्विनची शानदार खेळी

|
20th May 2022, 11:47 Hrs
रॉयल राजस्थान प्लेऑफमध्ये

मुंबई : आयपीएल २०२२ चा ६८ वा सामना चेन्नई आणि राजस्थान यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात राजस्थानने चेन्नईचा ५ गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर राजस्थानने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने ही धावसंख्या १९.५ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केली.

१५१ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला बटलर २ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि यशस्वीने संघाची धुरा सांभाळली. दोघांनी ५० धावांची भागिदारी केली. यादरम्यान संजू १५ धावा करून सँटनरच्या चेंडूवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर देवदत्तही जास्त वेळ मैदानावर राहू शकला नाही आणि ३ धावा करून बाद झाला.

तो बाद झाल्यानंतर यशस्वीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यालाही या खेळीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही आणि ५९ धावा करून तो बाद झाला. तो बाद झाल्यानंतर पुनरागमन करणारा हेटमायर ६ धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर अश्विन आणि परागने संघाची धावसंख्या पुढे नेली. यादरम्यान अश्विन आणि पराग यांनी सहाव्या विकेटसाठी ३९ धावांची भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला. अश्विनने या सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने २३ चेंडूत ४० धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचवेळी परागनेही त्याला चांगली साथ दिली आणि त्याने १० धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह राजस्थानने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

आयपीएल २०२२ च्या ६८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ६ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा केल्या. मोईन अलीने चेन्नईची ही खेळी वन मॅन शो बनवली. त्याने केवळ ५७ चेंडूत ९३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्याशिवाय धोनीनेही २६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचवेळी राजस्थानकडून चहलने २६ धावांत २ बळी घेतले.      

मोईन अलीचा ‘वन मॅन शो’      

प्रथम फलंदाजीला उतरल्यानंतर चेन्नईची सुरुवात खास नव्हती. संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड २ धावा करून बोल्टचा बळी ठरला. यानंतर मोईन अली आणि डेव्हन कॉनवे यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी केली. यावेळी मोईन अली त्याच्याच रंगात दिसला. त्याने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या भागिदारीत त्याने सर्वाधिक योगदान दिले. अश्विनने ही भागिदारी तोडली जी धोकादायक ठरली असती. त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. डेव्हन कॉनवेने १४ चेंडूत १६ धावा केल्या.      

सीएसकेची मधली फळी अपयशी      

डेव्हन कॉनवे बाद झाल्यानंतर चेन्नईची मधली फळी अपयशी ठरली. एन. जगदीसन एका धावेवर बाद झाला तर अंबाती रायुडूने ३ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर धोनी आणि मोईन अलीने संघाची धुरा सांभाळली. यादरम्यान धोनी आणि मोईन अली यांनी ५२ चेंडूत ५१ धावांची भागिदारी केली. यादरम्यान धोनीने २६ धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर मोईन अलीही बाद झाला. त्याने ५७ चेंडूत ९३ धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार आणि तीन षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांना शेवटच्या षटकात वेगवान धावा करता आल्या नाहीत आणि चेन्नईचा संघ २० षटकांत केवळ १५० धावा करू शकला.