समुद्रकिनारी पिकनिकसाठी जाताय…

Story: फॅशन पॅशन | प्राजक्ता पुंडलिक गांवकर |
20th May 2022, 10:10 pm
समुद्रकिनारी पिकनिकसाठी जाताय…

वर्षभरात उन्हाळा हा असा ऋतू असतो जो निळ्याशार समुद्रकिनारी पिकनिक करण्यासाठी योग्य असतो. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि बीचवर मजा करणे यातली गंमत काही औरच. समुद्रकिनाऱ्यावरील थंड वाऱ्याच्या झुळुक मनाला एक वेगळा आनंद देते. कुटुंबासोबतची ही सुंदर वेळ सर्व प्रकारे परिपूर्ण असावी असे प्रत्येकालाच वाटते. मौजमजा करण्याच्या उत्साहात आपण नेहमी काहीतरी पॅक करणे विसरतो आणि त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर आपली, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांची गैरसोय होते. त्यामुळे हे टाळण्यासाठी समुद्रकिनारी पिकनिकसाठी आवश्यक वस्तू घेऊन जाणे आवश्यक आहे.

सनग्लासेस

तळपत्या सूर्याकडे पाहणे अवघड असते आणि समुद्रकिनाऱ्यावर ते अधिकच गैरसोयीचे होते. त्यामुळे डोळ्यांना आराम देण्यासाठी सनग्लासेस घालणे चांगले. हे तुम्हाला स्टायलिश लुक देखील देतील. जर तुम्ही अजून सनग्लासेस खरेदी केले नसतील तर चांगल्या सनग्लासेसमध्ये गुंतवणूक करा कारण ते केवळ स्टाइलसाठी नाहीत तर ते अत्यंत आरामदायीसुद्धा असते. आपल्या डोळ्यांचे कडक सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यास सनग्लासेस मदत करतात.

सनस्क्रीन

भारतीयांना त्वचेच्या टोनसाठी, सनटॅनपासून त्यांचे संरक्षण करणे फार महत्त्वाचे वाटते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या त्वचेचे जळण्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे बीच पिकनिकसाठी सनस्क्रीन आवश्यक आहे. तुमचे घर सोडण्यापूर्वी सनस्क्रीन आपल्या त्वचेला लावले असल्याची खात्री करा आणि काही वेळानंतर समुद्रावर गेल्यानंतर पुन्हा प्रखर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून सनस्क्रीन त्वचेला लावा.  

टोपी

समुद्रकिनाऱ्यावरच्या प्रखर उन्हामध्ये हॅट तुम्हाला आवश्यक सावली देईल. तुम्हाला अतिशय स्टायलिश लुक देण्यासोबतच तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याचा हा आणखी एक मार्ग आहे.

रबरी पादत्राणे

समुद्रकिनाऱ्यासाठी हे सर्वात उपयुक्त आणि कार्यक्षम पादत्राण ठरते. समुद्रकिनाऱ्यावरील खारट पाण्यात आणि वाळूमध्ये तुमचे महागडे पादत्राण खराब करू नका. बीचवर चालण्यासाठी रबरी पादत्राण सर्वोत्तम आहेत. ते आरामदायक तसेच वापरण्यास हलके असतात.

सरॉन्ग्स / मल्टी ड्रेप कव्हरअप्स

बीच पिकनिकसाठी सरॉन्ग्स खूप महत्त्वाचे आहेत. पाण्यात मजा केल्यानंतर आणि वाळूवर आराम केल्यानंतर, तुम्हाला सारँग किंवा मल्टी ड्रेप कव्हरअपची आवश्यकता असते. हे तुम्हाला आराम देईल आणि तुम्हाला त्रासदायक परिस्थितींपासून वाचवेल.

टॅल्कम पावडर

हे तुम्हाला तुमच्या त्वचेवर चिकटलेली वाळू काढून टाकण्यास मदत करेल. वाळू चिकटलेल्या भागावर फक्त काही टॅल्कम पावडरने चोळा  आणि चिंधी कापडाने पुसून काढून तो भाग धुवा.