गोव्याचे मुंबईकरांना जाम आकर्षण!.. अर्थात मी जेव्हा लग्नाआधी मुंबईकर होते, तेव्हा मला ही गोव्याबद्दल जाम म्हणजे जामच आकर्षण होते. गोव्याची संस्कृती, निसर्ग हा प्रत्येकाला भुरळ पाडणारा असाच आहे. त्यामुळे गोव्यात जायला जो तो उत्सुक असायचा. त्या काळी मी सुद्धा याला अपवाद नव्हते !!...
१९८७ साली मैत्रिणींसोबत गोव्यात जायचा प्लान ठरला. आणि मग त्याच आनंदात गोव्याला जायची तारीख कधी जवळ येऊन ठेपली, ते कळलेच नाही... त्या वेळेस कोंकण रेल्वे अद्याप सुरू झाली नव्हती. त्यामुळे रेल्वे ने जायचे म्हटले तर प्रथम मुंबईहून मिरजला यावे लागायचे आणि मिरजहून दुसरी ट्रेन पकडून गोव्याला यावे लागत असे. हा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा पर्यटक जास्त करून बसने प्रवास करण्यास आपली पसंती दर्शवत असत.
बसमधून प्रवास आणि तोही मैत्रिणींसोबत म्हणजे अगदी धम्माल... गाणी, अंताक्षरी हे त्यावेळेचे आवडते खेळ. गाणी, अंताक्षरी म्हणता म्हणता पणजी शहरात पोहोचलो आणि आनंदाला उधाण आले.
मुंबईत पण समुद्र किनारे आहेत. परंतु गोव्याचे फेसाळणारे समुद्र पाहून मन हरखून गेले. समुद्रात लाटांसोबत खेळताना, वाळूत किल्ले बांधताना, ओल्या वाळूवर रेघोट्या मारून आपापली नावे लिहिताना त्या वेळी मन परत एकदा बालिश होऊन गेले. समुद्राच्या किनारी असलेले शंख शिंपले गोळा करण्यात जो आनंद असतो, तो लुटताना मला वेगळाच आनंद होत होता. मी तर माझे वय विसरून गेले होते.
वाळूवर अनेक लहान लहान खेकडे चालत चालत जातात तेव्हा त्या ओलसर वाळूतच लहानसे बीळ करून त्यात नाहीसे होतात. जिथे त्या खेकड्यांचे बीळ असते, तिथे त्या बीळाच्या मुखावर ओलसर वाळूच्या छोट्या छोट्या गोळ्यांनी छानशी नक्षी निर्माण होते. ही नक्षी बारीक नजरेने पाहिल्यास त्यातील कलात्मकता लक्षात येते. या सृष्टीतील प्रत्येक जीव हा काही ना काही तरी कला घेऊन जन्माला आला आहे. या कलेची सौंदर्यता पाहाण्यासाठी आपल्याला मात्र तशी दृष्टी हवी. समुद्रावरच्या ओल्या वाळूत छोट्या छोट्या खेकड्यांनी केलेली ही नक्षी व त्याचे विविध प्रकार न्याहाळताना त्यातील एक खेकडा पकडायचा मोह झाला खरा. पण तो आवरता घेतला!!....
संध्याकाळच्या सुमारास जेव्हा सूर्य आपल्या सहस्त्र किरणांवर स्वार होऊन अस्ताला जायच्या तयारीत असतो, तेव्हा आकाशात सुंदर अशा विविध रंगांची उधळण निसर्ग मुक्त हस्ते करत असतो. मुंबईच्या घाई गर्दीच्या प्रत्येक क्षणात निसर्गाचा हा सुंदर आविष्कार न्याहाळण्याची दृष्टी कुठेतरी नाहीशी होत गेलेली होती. परंतु इथे गोव्यात आल्यावर निसर्गाने क्षितिजावर उधळलेले ते रंगीबेरंगी रंग पाहून मनाच्या कडा ही रंगीत झाल्या आणि निसर्ग किती महान कलाकार आहे, याची प्रचिती आली. हे सर्व क्षण मी मनाच्या कॅमेरात बंदिस्त करून ठेवले आहेत.
फेसाळणार्या दर्याचा धीरगंभीर आवाज हा माझ्या मनाला नेहमीच मोहवून टाकतो. हा आवाज ऐकताना त्यातील लय, नाद, संगीत अनुभवताना मी एका वेगळ्याच विश्वात पोहोचते, जिथे फक्त मी आणि समुद्र आणि समुद्राच्या लाटांचा तो एका लयीत येणारा धीरगंभीर आवाज असतो. हे शांत क्षण डोळे मिटून एकांतात अनुभवताना मन कुठेतरी वेगळ्याच दुनियेत विहार करावयास लागते.
समुद्राच्या लाटां न्याहाळणे हा माझा आवडता छंद जरी असला, तरी त्याची पूर्तता मात्र गोव्यात झाली. समुद्राच्या किनार्यावर वाळूवर हळुवार बसताना एकीकडे असलेल्या तांबड्या रंगाच्या डोंगराच्या उंचच उंच कडा, समोर नाचत असलेला पंधराशुभ्र फेसाळणारा दर्या, त्यापलीकडील सूर्याच्या किरणांनी रंगीत झालेले क्षितीज व क्षितिजाच्या कडेला असलेल्या काही बोटी, निळ्या आकाशाच्या पटलावर उडत जाणार्या पक्षांच्या माळा न्याहाळताना मनावरील सर्व ताण आपसूकच दूर व्हायला मदत होते. किनार्यावरच्या काळ्या फातरांवर फुटणार्या लाटा आणि त्यातून उसळणारा तो पांढरा शुभ्र फेस ... आहाहा... हे सौंदर्य निरखताना निसर्गाचे वरदान आपल्याला किती भरभरून लाभले आहे, याची जाणीव झाल्याशियाय रहावत नाही. गोव्याचे हे सौंदर्य न्याहाळताना मी मात्र गोव्याच्या प्रेमात आकंठ बुडून गेले आणि मग गोव्याचीच होऊन गेले!!....