चाकूने धमकावल्याप्रकरणी एकास अटक, एकाचा शोध सुरू


08th May 2022, 11:37 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
चुकीच्या मार्गाने गाडी हाकणाऱ्या व अपघातास कारणीभूत ठरू शकणाऱ्या कारचालकास विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करत चाकू दाखवून धमकावण्याचा प्रकार बोर्डा फातोर्डा परिसरात घडला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर व दीपक साठे यांनी फातोर्डा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर फातोर्डा पोलिसांनी याप्रकरणातील इक्बाल हवालदार या संशयिताला अटक केली आहे. याप्ऱकरणातील दुसरा संशयित अजूनही पोलिसांच्या हाती आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार धमकावण्याची ही घटना शनिवारी घडली. बोर्डा फातोर्डा परिसरातून तक्रारदार दीपक साठे (रा. गवळीवाडा) आपल्या आईला घेऊन अॅक्टीव्हा दुचाकीवरून मडगावच्या दिशेने जात होते. यावेळी चुकीच्या मार्गाने स्विफ्ट कार हाकणाऱ्या चालकामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीचालकाची धडक बसणार होती. याबाबत दुचाकीस्वाराने स्विफ्ट कारमधील इक्बाल हवालदार (रा. पाजीफोंड) व नागराज (रा. मोतीडोंगर) यांना विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर नागराज या संशयिताने गाडीतून खाली उतरत चाकू काढून धमकावण्याचा प्रयत्न केला.
दुचाकीस्वाराने या घटनेचा व्हिडिओ काढत समाजमाध्यमावर टाकत अशा प्रकारांवर कारवाईची मागणी केली तसेच फातोर्डा पोलिसांतही संशयितांनी चाकू दाखवत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिलेली होती. या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलिसांनी संशयित इक्बाल याला अटक केली. तर फरार संशयित नागराजचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल विल्टन रिबेलो तपास करत आहेत.          

हेही वाचा