एफसी गोवाचे आव्हान धोक्यात

बचावफळीतील चुकांमुळे नुकसान : ईस्ट बंगालने नोंदवला पर्वातील पहिला विजय

|
19th January 2022, 11:23 Hrs

पणजी : इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) बुधवारच्या लढतीत इतिहासाची नोंद झाली. एससी ईस्ट बंगालने आयएसएलच्या या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद करताना एफसी गोवा संघाचे स्पर्धेतील आव्हान संकटात आणले आहे. 

एफसी गोवाला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी पूर्ण ३ गुणांची गरज असताना त्यांना ईस्ट बंगालने धक्का दिला. याला कारणीभूत एफसी गोवाचे खेळाडू ठरले. त्यांच्या बचावफळीतील झालेल्या चुकांचा महेश नाओरेम सिंग (९ मि. व ४२ मि.) याने फायदा उचलून दोन गोल केले. एफसी गोवाकडून अल्बेर्टो नोगुएरा (३७ मि.) याने एकमेव गोल केला. 

एफसी गोवा आणि एससी ईस्ट बंगाल या दोन्ही संघांना आयएसएलमधील आव्हान कायम राखण्यासाठी आता पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळेच दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पण, ९ व्या मिनिटाला एफसी गोवाच्या खेळाडूंची चूक ईस्ट बंगालच्या पथ्यावर पडली. एफसी गोवा संघाच्या खेळाडूने चेंडू स्वतःच्या गोलजाळीच्या दिशेने एडू बेडियाकडे टोलवला, परंतु बेडियाला चेंडूवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि हिच संधी ईस्ट बंगालच्या महेश नाओरेम सिंगन हेरली. त्याने गोलरक्षक धीरजला चकवून ईस्ट बंगालसाठी पहिला गोल केला. त्यानंतर एफसी गोवा संघाकडून सातत्याने गोल करण्याचे प्रयत्न झाले. बऱ्याचदा त्यांची गोल करण्याची संधी थोडक्यात हुकली. 

अखेर ३७व्या मिनिटाला जॉर्ज ऑर्टीजच्या लेफ्ट फ्लँक पासवर अल्बेर्टो नोगुएराने अप्रतिम गोल केला. पण, त्यांना फार काळ हा बरोबरीचा आनंद राखता आला नाही. याही वेळेस गोवाच्या खेळाडूंच्या चुकीचा फायदा महेशने उचलला आणि ईस्ट बंगालसाठी दुसरा गोल केला. ४२व्या मिनिटाला महेशने गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. पुढच्याच मिनिटाला एफसी गोवाचा बरोबरीचा गोल करण्याचा प्रयत्न ईस्ट बंगालचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यने अडवला. 

पहिल्या हाफमध्ये ईस्ट बंगालने आघाडी घेतली असली तरी चेंडूवर सर्वाधिक ताबा हा एफसी गोवाचा होता आणि त्यांचे आक्रमण सुरेख झाले. फक्त त्यांना अंतिम स्वरूप देता आले नाही. दुसऱ्या हाफमध्ये एफसी गोवाकडून दमदार खेळ झालेला पाहायला मिळाला. पण ५१ व्या मिनिटाला एफसी गोवाला धक्का बसला. अॅलेक्झांडर जेसुराजला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे तो फार निराश दिसला. त्याच्या जागी रेडीम टीलांग मैदानावर आला. महत्त्वाचे तीन गुण मिळवण्यासाठी एफसी गोवाकडून सातत्याने आक्रमण होताना दिसले, परंतु ईस्ट बंगालची बचावफळी तितक्याच सक्षमपणे त्यांना उत्तर देताना दिसली. एफसी गोवाने ८०व्या मिनिटाच्या खेळापर्यंत ४ ऑन टार्गेट व ८ ऑफ टार्गेट प्रयत्न केले, परंतु त्यांना गोल करण्यात अपयश आले.