चिनी ड्रॅगनच्या विळख्यामुळे लंकेत महागाईचा उच्चांक !

Story: विश्वरंग | सुदेश दळवी |
15th January 2022, 08:07 pm
चिनी ड्रॅगनच्या विळख्यामुळे लंकेत महागाईचा उच्चांक !

करोनामुळे जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला. परिणामी ज्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग पर्यटनावर आधारित आहे, त्या देशांची परिस्थिती बिकट झाली आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंकाही याला अपवाद नाही. अर्थव्यवस्थेची मोडलेली कंबर आणि त्यातच परदेशी कर्जाचे ओझे यामुळे श्रीलंकेचे दिवाळे निघाले आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. नागरिकांना तीन वेळेचे जेवण सोडा, दुधाचा चहाही मिळणे अवघड झाले आहे.             

सुमारे २.२ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात अभूतपूर्व असे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशातील खाण्या-पिण्याच्या गोष्टी प्रचंड महागल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार भाज्या, दूध अशा गोष्टींच्या किमतींमध्ये एका महिन्यात तब्बल १५ टक्के वाढ झाली आहे. अवघ्या १०० ग्रॅम मिरचीसाठी नागरिकांना ७१ रुपये मोजावे लागत आहेत. वांगी ५१ टक्के, कांदा ४० टक्के, तर टोमॅटो १० टक्के महागला आहे. एक किलो बटाटा हा तब्बल २०० रुपयांना मिळतो. तर, चारच महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही दुप्पट झाली आहे. यामुळे घरोघरी आता पुन्हा चुली पेटताना दिसून येत आहेत.                  

२०२१च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत श्रीलंकेचे परदेशी चलन भांडार हे केवळ १.६ अब्ज डॉलर एवढेच राहिले होते. आता देशात पुढील काही आठवडे आयात करण्यासाठी पैसे शिल्लक आहेत. याचाच फटका मिल्क पावडर आयातीलाही बसला आहे. आयात होत नसल्यामुळे देशातील दूध पावडरच्या किंमती १२.५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे कॅफे ओनर्स असोसिएशनने दुधाचा चहा बनवणे बंद केले आहे. केवळ मागणीनुसार, आणि जास्त दराने दुधाचा चहा ग्राहकांना दिला जातो आहे.                  

श्रीलंकेतील विरोधी पक्ष प्रमुख आणि अर्थतज्ज्ञ हर्षा डिसिल्वा यांनी सांगितले, की लवकरच यावर काही उपाय केला गेला नाही; तर देश कंगाल होईल. आयात पूर्णपणे थांबेल आणि आयटी सेक्टरही पूर्णपणे ठप्प होईल. सध्या देश गुगल मॅप्सचे पैसे देण्याच्या स्थितीमध्येही नाही. त्यामुळे देशातील गुगल मॅप्सची सेवाही बंद होऊ शकते, असेही हर्षा म्हणाले. दरम्यान, श्रीलंकेची अशी स्थिती होण्यासाठी जसा करोना कारणीभूत आहे, तसेच चीनकडून घेतलेले कर्जही प्रमुख कारण आहे. चीनकडून श्रीलंकेने आधीच पाच अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. त्यात गेल्या वर्षी आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी आणखी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज श्रीलंकेने चीनकडून घेतले. चीन आणि इतर देशांचे मिळून येत्या वर्षभरात श्रीलंकेला तब्बल ७.३ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचं आहे. एकूणच, चिनी ड्रॅगनने घातलेल्या कर्जाच्या विळख्यात श्रीलंका पुरती अडकली आहे. याचा फटका श्रीलंकेतील सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसत आहे. श्रीलंकेची झालेली ही परिस्थिती पाहता, चीनच्या आश्रयाला असलेल्या इतर देशांनी त्यातून धडा घेणे गरजेचे आहे.