पांडुरंग मडकईकर यांना गोवा खंडपीठाची नोटीस

|
08th December 2021, 12:34 Hrs
पांडुरंग मडकईकर यांना गोवा खंडपीठाची नोटीस

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : जुने गोवा पोलीस स्थानकासाठी असलेल्या जमिनी प्रकरणी कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या विरोधातील चौकशी तक्रारदार नसल्याने दक्षता विभागाच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने बंद केली होती. ही चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी याचिका डाॅ. रामाकृष्ण धुमे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली आहे. याची दखल घेऊन खंडपीठाने आमदार मडकईकर यांना नोटीस बजावली आहे.                   

जुने गोव्यात पोलीस स्थानकाची मागणी आमदार मडकईकर यांनी २००४ साली केली होती. या मागणीनुसार मनोहर पर्रीकर २००४ साली मुख्यमंत्री असताना अनंत धुमे यांची ९,४७५ चौरस मीटर जमीन पोलीस स्थानकासाठी राखीव ठेवली होती. त्यानंतर ही जमीन मडकईकर यांच्या आस्थापनाने घेतल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पर्रीकर यांनी २३ जुलै २०१४ रोजी विधानसभेत या चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणी दक्षता खात्याचे भ्रष्टाचार विरोधी पथकाने प्राथमिक चौकशी सुरू केली. २०१६ मध्ये या प्रकरणी तक्रारदार पुढे येत नसल्याचे कारण समोर करून चौकशी बंद केली. ही चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी याचिका डाॅ. धुमे यांनी खंडपीठात दाखल केली आहे. याची दखल घेऊन न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. एम. एस. जवळकर या द्विसदस्यीय खंडपीठाने आमदार मडकईकर यांना नोटीस बजावली आहे.