नागालँड : लष्करी तुकडीविरोधात पोलिसांत एफआयआर नोंद

घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक


06th December 2021, 11:53 pm
नागालँड : लष्करी तुकडीविरोधात पोलिसांत एफआयआर नोंद

मोन : नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये शनिवारी रात्री सहा खाण मजुरांसह १४ नागरिक ठार झाले, तर ११ हून अधिक जखमी झाले. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खबळबळ उडाली असताना आता पोलिसांनी या प्रकरणी लष्कराच्या २१ पॅरा विशेष दलाच्या तुकडीविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
गोळीबाराची पहिली घटना शनिवारी सायंकाळी जवानांच्या गैरसमजातून घडल्याचे म्हटले जात आहे. काही खाण मजूर एका वाहनातून परतत होते. ते मजूर म्हणजे ‘नॅशनल सोशॅलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड’च्या (एनएससीएन- के) ‘युंग आँग’ गटाचे बंडखोर आहेत, असा समज करून सुरक्षा जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात सहा मजूर ठार झाले. कामगार घरी परतले नसल्याने काही स्थानिक ग्रामस्थ त्यांचा शोध घेण्यासाठी जात असताना त्यांना लष्करी वाहनांनी घेरले. त्यानंतर ग्रामस्थ आणि जवान यांच्यात झालेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू झाला. यावेळी जवानांनी ग्रामस्थांवर पुन्हा गोळीबार केला. त्यात आणखी सात नागरिकांचा बळी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, पॅरा स्पेशल दलाने स्थानिक पोलिसांना सूचित केले नव्हते किंवा कोणी पोलीस गाईडदेखील घेतला नव्हता. ‘नागरिकांना मारण्याचा आणि जखमी करण्याचा सुरक्षा दलाचा हेतू’, असे नमूद केले आहे. नागालँड सरकारने पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ही घटना जवानांनी नागरिकांना ओळखण्यात चूक केल्याने घडली की त्यामागे अन्य काही कारण आहे, याची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा