आमदार बाबूश-उत्पलचे नड्डांसमोर श​क्तिप्रदर्शन

आमदार बाबूश यांनी काही प्रमाणात बाजी मारल्याचे स्पष्ट

|
26th November 2021, 12:14 Hrs
आमदार बाबूश-उत्पलचे नड्डांसमोर श​क्तिप्रदर्शन

फोटो : पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आमदार बाबूश मॉन्सेरात आणि कार्यकर्ते.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर पणजीतून लढण्यास इच्छुक असलेले विद्यमान आमदार बाबूश मॉन्सेरात आणि माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर या दोघांनीही गुरुवारी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यात आमदार बाबूश यांनी काही प्रमाणात बाजी मारल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बुधवारी रात्री गोव्यात दाखल झाले. गुरुवारी सकाळी पणजीतील श्री महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन ते देवीचे दर्शन घेणार होते. हीच संधी साधत आमदार बाबूश आणि उत्पल पर्रीकर या दोघांनीही गुरुवारी सकाळी महालक्ष्मी मंदिरासमोर आपापले समर्थक गोळा केले होते. त्यात बाबूश समर्थक अधिक दिसून आले. शिवाय नड्डा मंदिर परिसरात आल्यानंतर त्यांच्यासमोर बाबूश समर्थकांनी बाबूश यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. दोन्हीही नेत्यांनी नड्डांना आपापले बळ दाखवण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण, बाबूश समर्थक अधिक असल्याने उत्पल पर्रीकरांच्या मोजक्या समर्थकांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे झळकत होती.
दरम्यान, बाबूश आणि उत्पल या दोघांनीही उमेदवारीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. पण, भाजपच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यांनी बाबूश यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. तसे झाल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतो, असे संकेत उत्पल यांनी पक्षाला दिले आहेत. त्यामुळे पणजीतील भाजपात अस्वस्थता पसरली आहे. यावर भाजप कशापद्धतीने तोडगा काढणार, हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.