मडगाव मच्छी मार्केटमधील असुविधांबाबत चुकीची माहिती

ठेकेदार मालाग्रीस फर्नांडिस यांचा दावा : मौलाना इब्राहीम यांच्यावर टीका

|
25th November 2021, 11:05 Hrs
मडगाव मच्छी मार्केटमधील असुविधांबाबत चुकीची माहिती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
‘फॉर्मेलिन माफिया’ म्हणून प्रसिद्ध मौलाना इब्राहीम यांच्याकडून ‘एसजीपीडीए’च्या घाऊक मच्छी मार्केटमधील असुविधांबाबत चुकीची माहिती देण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांचे चुकीचे व्यवहार बंद केल्यामुळेच त्यांची आगपाखड झालेली आहे, असा आरोप ठेकेदार मिलाग्रीस फर्नांडिस यांनी केला आहे.
‘एसजीपीडीए’च्या घाऊक मच्छी मार्केटबाहेर पत्रकार परिषद घेत ठेकेदार मिलाग्रीस फर्नांडिस यांनी मार्केटमधील असुविधांबाबत झालेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. महाराष्ट्र व कर्नाटक येथील गाड्या मार्केटमध्ये आल्यानंतर साचलेले पाणी मार्केटमध्येच रिक्त करतात. हे सर्व इब्राहीम यांचेच एजंट आहेत. इब्राहीम यांचे काही एजंट गाड्या रस्त्यावर पार्क करून संरक्षक भिंतीवरून टोपल्या मार्केटमध्ये आणण्याचा प्रकार करतात. त्यांच्या या प्रकारालाही आळा घातलेला आहे. मार्केटमधील उभ्या असणाऱ्या गाड्याचा धक्का बसल्याने वारंवार दिवे खराब होतात. त्याबाबत वीज खात्याकडे तत्काळ अर्ज केले जातात, मात्र त्यांच्याकडून कारवाईसाठी दिरंगाई होत आहे. याशिवाय मार्केटबाहेर रस्त्यावर मासळी विक्री करणाऱ्यांकडून पालिकेने नेमलेला ठेकेदार पैसे वसूल करत आहे. मार्केटमध्ये पाचशे व्यक्तींना व्यवसायाकरिता जागा दिल्याचा आरोपही खोटा आहे. एवढ्या जणांना जागा दिल्यास गाड्यांना उभ्या करण्यास जागा राहणार नाही. याउलट रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यामुळे या गाड्या रस्त्यांवरून हटविण्यात याव्यात, अशी मागणीही मिलाग्रीस यांनी केली आहे.