नोकरीच्या गाजराची पुंगी खरंच वाजेल का ?

गोवा

Story: अंतरंग | नारायण गावस |
28th October 2021, 12:00 am
नोकरीच्या गाजराची पुंगी खरंच वाजेल का ?

गोवा सरकारच्या विविध खात्यांतर्फे सध्या सरकारी नोकऱ्यांचा जाहिराती आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून वेळोवेळी  १० हजार नोकऱ्यांचे  आमिष गोमंतकीय बेरोजगारांना दाखविले जात आहे. प्रत्येक खात्यामध्ये  युवक या नोकऱ्यांसाठी अर्जही करत आहेत. आता फक्त सरकारकडे पुढील दीड महिना शिल्लक असल्याने या सर्व सरकारी पदांची भरती होणार की नाही अशी शंका सध्या बेरोजगार युवकांना पडलेली आहे. गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारच्या काळात खूपच अल्प प्रमाणात सरकारी नोकऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात बेरोजगारीचा विस्फोट झाला. युवक पदवी, पदव्युत्तर होऊन बेरोजगार आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षक असो किंवा मदतनीस, कारकून अशा सर्वसाधारण पदांसाठी उच्च शिक्षित बेराेजगार युवक अर्ज करत आहे. अशी भयावह स्थिती सध्या बेरोजगारांची झाली आहे.      

गेल्या  म​हिन्यापासून सरकारी नोकऱ्यांच्या जाहिरातींचा  पाऊस पडला आहे. काही खात्याच्या पदांची भरती करण्यात आली अाहे, पण आराेग्य, पोलीस सारख्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पदांची भरती केली जाणार आहे. मुख्यमंत्री ​डिसेंबरपर्यंत सर्व १० हजार पदांची भरती केली जाणार असल्याचे प्रत्येकवेळी आश्वासन देत आहेत. त्यामुळे सर्व बेराेजगार युवक सरकारच्या या आशेवर डोळा ठेवून आहे. जर आचारसंहिता लागू झाली तर ही सरकारी पदे भरणे सरकारला अवघड होणार आहे. काही पदांसाठी अर्ज केले तरी उमेदवारांना अजून लेखी परीक्षेसाठी पत्र आलेले नाही.  तसेच आता वेळही खूप कमी  असल्याने ही सर्व पदे भरणार की नाही अशी शंका सध्या सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे. खासगी क्षेत्रांत मनासारखा पगार तसेच नोकरीची सुरक्षा नसल्याने प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. यासाठी प्रत्येकजण  विविध पदांसाठी अर्ज करत आहे, पण प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणारच  असे नाही. राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय सरकारी नोकरी  मिळणे कठीण असते; त्यामुळे सर्वसामांन्य  गरीब युवकांना ही नोकरी मिळत नाही तरीही बेरोजगार युवक मनात एक अाशा बाळगून प्रत्येक पदांसाठी अर्ज करत असतात.       

सध्या या सरकारी पदांसाठी  मंत्री आमदारांमध्ये अंतर्गत वादविवाद सुरू आहेत. प्रत्येक मंत्री, आमदार आपल्या मतदारसंघातील युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देत आहेत. पण या नोकऱ्या नक्की कुणाच्या गळ्यात पडणार हा येणारा काळच सांगणार आहे.  प्रत्येक मंत्री आपल्या खात्यातील नोकरी अापल्या जवळचे कार्यकर्ते तसेच नातेवाईकांना देण्यासाठी आटापिटा करत आहे. पण आता फक्त सरकारकडे दीड महिना शिल्लक असल्याने या कालावधीत सर्व पदांची भरती करावी लागणार आहे, तरच येणारी निवडणूक  भाजपसाठी  सोपी जाणार आहे. जर आश्वासन देऊनही सरकारने या  नोकऱ्यांची भरती केली नाही, तर सरकारला येणाऱ्या निवडणुकीत जनतेला सामाेरे जावे लागणार आहे. मागील ४.५ वर्षात भाजपने काहीच सरकारी नोकऱ्यांची भरती केली नसल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे.