चीनमध्ये पुन्हा लॉकडाउन

|
26th October 2021, 10:20 Hrs
चीनमध्ये पुन्हा लॉकडाउन

चीनमध्ये पुन्हा लॉकडाउन
बीजिंग :
जगभरात करोनाने थैमान घातले तेव्हा चीन सर्ंवात आधी सुरळीत व्यवहार करू लागला. त्यामुळे नंतर करोनाच्या चर्चेतून चीन पार हद्दपारच झाला. पण आता पुन्हा एकदा करोनामुळे चीन चर्चेत आला आहे. कारण मध्ये मोठ्या संख्येने करोना रुग्ण आढळू लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून चीनने कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून आता तर एका अख्ख्या शहरातच चीनने लॉकडाउन लागू केला आहे.
चीनच्या लँझो शहरामध्ये जवळपास ४० लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. पण, अशा शहरामध्ये मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याचे समोर आल्यानंतर चीनने एक मोठा निर्णय घेतला. या संपूर्ण शहरात चीनने कठोर लॉकडाउन लागू केला. जर फारच आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडण्याचे नागरिकांना आदेश देण्यात आले आहेत.
चीनमध्ये मंगळवारी नव्या डेल्टा व्हेरिएंटचे २९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६ रुग्ण हे लँझो शहरात आढळून आले आहेत. याआधी चीनने सोमवारी बीजिंगमधील पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घातली आहे. तसेच, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी शहराबाहेर जावे, असे देखील निर्बंध प्रशासनाने घातले आहेत. सोमवारी चीनमध्ये एकूण ३९ डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण सापडले असून आता या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १०० वर गेली आहे.
चीनमध्ये सापडलेल्या करोना रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. मात्र, चीनने सुरुवातीपासूनच शून्य रुग्ण धोरण अवलंबले असल्यामुळे १०० रुग्णांचा आकडा देखील चीनसाठी काळजी वाढवणारा ठरला आहे. बीजिंगमधील अनेक रहिवासी भागांमध्ये चीनने लॉकडाउन लागू केला आहे.