कॅनन कंपनीच्या फसवणूक प्रकरणी राजस्थानच्या दोघा संशयितांना अटक

|
26th October 2021, 12:16 Hrs
कॅनन कंपनीच्या फसवणूक प्रकरणी राजस्थानच्या दोघा संशयितांना अटक

फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या संशयितांसह कळंगुट पोलीस.      

प्रतिनिधी। गोवन वार्ता        

म्हापसा : ऑर्डर केलेल्या कॅनन कंपनीच्या कॅमेऱ्याच्या जागी भलतीच वस्तू परत करून १ लाख २३ हजारांचा कॅमेरा हडप केल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी लक्षय गुप्ता (२०) व हर्ष गुप्ता (२०) या दोघाही जयपूर राजस्थानच्या संशयितांना अटक केली.      

या प्रकरणी पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात असलेल्या कॅनन लॉजेस्टिक प्रा. लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक समीर तायशेटे यांनी तक्रार दाखल केली होती.      

संशयित आरोपींनी अॅमेझॉन ऑनलाईन साईटवरून ‘कॅनन ९० डी डीएसएलआर’ या मॉडेलचा १ लाख २३ हजार ४९० रुपयांचा कॅमेरा ऑर्डर केला होता. हा कॅमेरा कंपनीतर्फे वितरण एजन्टामार्फत संशयितांकडे सुपूर्द करण्यात आला होता, पण संशयितांनी हा कॅमेरा ऑर्डर केलेल्या कॅमेऱ्यापेक्षा वेगळाच असल्याचे सांगून परत केला. परंतु परत केलेली वस्तू भलतीच देऊन संशयितांनी पोबारा केला.      

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे फसवणुकीचा गुन्हा नोंद करून कळंगुट पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेत वरील गुन्ह्याखाली अटक केली. दोन्ही संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.