पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय

टी-२० विश्वचषकातील सामन्यात भारतावर प्रथमच मात : विराट-पंतची लढत व्यर्थ

|
25th October 2021, 12:08 Hrs
पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय

दुबई : टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात पराभवाने केली आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध दारूण पराभव स्वीकारावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानने १७.५ षटकांत सहज लक्ष्य गाठले. भारतीय संघ पाकिस्तानची एकही विकेट पाडू शकला नाही आणि बाबर आझमच्या संघाने १० गडी राखून विजय मिळवला. 

बाबर आझम, महम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांनी पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बाबर आझम आणि रिझवानने अर्धशतके ठोकली आणि शाहीन आफ्रिदीने ३ मौल्यवान विकेट घेत बॉलने कहर केला. महम्मद रिझवानने नाबाद ७९ आणि बाबर आझमने नाबाद ६८ धावा केल्या. पाकिस्तानने पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव केला आहे. याआधी टी -२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताला सलग ५ सामन्यांमध्ये नमवले होते, पण यावेळी ते जिंकले.

दुबईच्या पाटा खेळपट्टीवर भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. रोहित शर्माला खाते उघडता आले नाही. केएल राहुल अवघ्या ३ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवनेही ११ धावांची खेळी केली. तीन गडी लवकर गमावल्यामुळे भारताला पहिल्या १० षटकात केवळ ६० धावा करता आल्या. विराट कोहली आणि पंत यांनी अर्धशतकी भागिदारी करून टीम इंडियाला नक्कीच आशा दिली. पंतने ३० चेंडूत ३९ धावा केल्या. यानंतर विराट कोहली १९ व्या षटकापर्यंत उभा राहिला आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाने कसे तरी १५० च्या पुढे मजल मारली.

बाबर-रिझवानची अप्रतिम फलंदाजी

पाकिस्तानी गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर बाबर आझम आणि महम्मद रिझवान यांच्या फलंदाजीने भारताला बॅकफूटवर ढकलले. बाबर आझमने संथ सुरुवात केली, तर दुसरीकडे रिझवानने कमकुवत चेंडू ठोकून काढले. दोन्ही खेळाडूंनी ७.४ षटकांत ५० धावा जोडल्या. पण १० व्या षटकापर्यंत या खेळाडूंनी संघाला ७१ धावांवर नेले. आव्हान लहान होते, त्यामुळे बाबर आझम आणि महम्मद रिझवान आरामात खेळत होते. त्यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. सेट झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी जोमाने फलंदाजी केली आणि पाकिस्तानने १२.५ षटकांत १०० चा आकडा पार केला. पॉवरप्लेनंतर रिझवान आणि बाबरने आक्रमक खेळायला सुरुवात केली. १३व्या षटकात बाबरने वरुण चक्रवर्तीला शानदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात पाकिस्तानने शंभरी ओलांडली. बाबरपाठोपाठ रिझवाननेही बुमराहला चौकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. त्याचे हे भारताविरुद्ध पहिले अर्धशतक ठरले. १८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा, तर रिझवानने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा केल्या.

आमच्या सलामीचे गडी झटपट बाद झाले. त्यामुळे सामन्यात पुनरागमन करणे कठीण असते. मैदानातील दव पाहता कठीण होते. पाकिस्तानने दर्जेदार गोलंदाजी केली. आमचा संघ पॅनिक होणारा नक्कीच नाही. ही स्पर्धेची सुरुवात आहे शेवट नाही, असे कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले.