अलौकिक बुद्धिमत्तेचा स्वामी : अथर्व नाडकर्णी


06th October 2021, 09:12 am
अलौकिक बुद्धिमत्तेचा स्वामी : अथर्व नाडकर्णी

अलौकिक बुद्धिमत्तेचा स्वामी : अथर्व नाडकर्णी
पणजी :
मडगाव येथील आठ वर्षांचा अथर्व नाडकर्णी याने ‘विझ नॅशनल मेगा फायनल राउंड २०२१’मध्ये द्वितीय स्थान पटकावले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यस्तरीय फेरीत प्रथम आल्यानंतर त्याने राष्ट्रीय स्तरावरील फेरीत गोव्याचे आणि आपल्या शाळेचे म्हणजेच विद्या विकास अकादमीचे प्रतिनिधित्व केले. अंतिम फेरीत देशभरातून अनेक विद्यार्थी होते.
शालेय, आंतरशालेय, राज्य आणि राष्ट्रीय  स्तरावर स्पर्धेच्या फेर्‍या घेण्यात आल्या. स्पर्धकांना शब्दांचे स्पेलिंग करण्यास सांगितले गेले आणि त्यांना उच्चार, ध्वन्यात्मकता आणि शब्दांच्या अर्थाचे चांगले ज्ञान असणे अपेक्षित होते. त्यासाठी केवळ घोकंपट्टी करून चालणारे नव्हते, तर सखोल अभ्यास आवश्यक होता. त्याच आधारावर स्पर्धकाला गुण दिले जातात.
वयाच्या तिसर्‍या वर्षी अथर्व देवनागरी लिपी वाचू शकत होता. या व्यतिरिक्त, त्याला सर्व भारतीय राज्यांच्या राजधान्या, जागतिक राजधान्यांची माहिती होती आणि तो आवर्त सारणीचे सर्व घटक त्यांच्या अणू क्रमांक आणि चिन्हे, न्यूटनचे नियम, आर्किमिडीज फ्लोटेशनचा कायदा इत्यादी सांगू शकतो. कोणतीही संख्या आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार तोंडी वापरून गणना करणे त्याला एवढ्या कोवळ्या वयातच जमत होते.
अथर्वने अप्पर केजीमधील ब्लॅकबोर्डवर स्वतः एक पायथॅगोरस प्रमेय सोडवले. तोपर्यंत, त्याने एमआयटीची स्क्रॅच शिकण्यास सुरुवात केली होती आणि नंतर  'सी' ही प्रोग्रॅमिंग भाषा  शिकला. एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट वापरून त्याने स्वतःचे संकेतस्थळ (www.atharvnadkarni.com)  
विकसित केले, हे सर्व फक्त पाच वर्षांचा असताना त्याने साध्य केले, अशी माहिती त्याचे वडील मयूर नाडकर्णी यांनी दिली.
आजकाल अथर्व पायथॉन/किवी प्रोग्रॅमिंगचा वापर करून एका ऍपवर काम करत आहे आणि तो प्रोग्रॅम सर्वांसोबत शेअर करण्याची त्याची इच्छा आहे. तो त्रिमितीय ग्रह, सौर यंत्रणा इत्यादी बनवण्यासाठी ‘ब्लेंडर ३ डी’ वापरतो. संस्कृत आणि पोर्तुगीज भाषा सध्या अथर्व शिकत आहे, अशी माहितीही मयूर यांनी दिली.
अलीकडेच अथर्वने सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन (एसओएफ) द्वारे आयोजित ऑलिम्पियाडमध्ये, आंतरराष्ट्रीय सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि गणित ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट पदके आणि प्रमाणपत्रे जिंकली आहेत.
अथर्वच्या मते गणित हा अजिबात कठीण प्रकार नसून गणितासारखे मनोरंजक दुसरे काही नाही. या वयातच तो बारावीच्या मुलांची गणिते सोडवतो. एवढेच नव्हे तर तो गणित, क्वांटम मेकॅनिक्स आणि त्याच्या आवडीच्या इतर विषयांवर ब्लॉग लिहितो. त्याने लिहिलेले ब्लॉग त्याच्या
www.atharvnadkarni.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अथर्व एक उत्कृष्ट यूट्यूबर आहे आणि स्वतःचे व्हिडिओ तयार करतो, त्याच्या आवडीच्या विविध विषयांवर व्हिडिओ पोस्ट करतो, स्क्रिप्ट लिहितो, कथन करतो, संगीत बनवतो आणि व्हिडिओ www.youtube.com/athroid वर अपलोड करण्यापूर्वी स्वतः त्यांचे संपादनही करतो. त्याच्या यूट्यूब चॅनेल व्यतिरिक्त, तो सोशल मीडियावर फेसबुक पेज (Atharv Mayur Nadkarni) आणि इन्स्टाग्राम पेज (@atharvmn) त्याच्या वडिलांसह ती खाती सांभाळत आहे.
असे नाही की, अथर्व फक्त गणित यासारख्या रूक्ष विषयांतच रमतो. त्याशिवाय तो बास्केटबॉल खेळतो, म्युझिकल कीबोर्ड वाजवतो, गाणी म्हणतो. त्याला कोकणी, हिंदी, आणि इंग्रजी गीत संगीत खूप आवडते.



जन्मजात शब्दप्रभू!
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीला अथर्वने सार्थ ठरवले. त्याच्या आकलन शक्तीचा प्रत्यय त्याच्या पालकांना अतिशय कोवळ्या वयात आला. केवळ दीड वर्षांचा असताना अथर्वने अक्षरे आणि संख्या ओळखण्यास सुरुवात केली. तीन वर्षांचा असताना त्याने इल्युस्ट्रेटेड ऑक्सफोर्ड डिक्शनरीमधील शब्द वाचण्यास सुरुवात केली आणि इंग्रजी शब्दकोशातील सर्वांत लांब शब्द, ४५-अक्षरांचा वैद्यकीय शब्द लिहिण्यास सुरुवात केली.

इंग्रजी शब्दकोशातील शब्दांचा अभ्यास करून आणि पुस्तके वाचून अथर्वने तयारी केली होती. त्याच्या या तयारीचे कौतुक व अभिनंदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर केले.
- मयूर नाडकर्णी,
अथर्वचे वडील.

मला अशा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायला आवडते. आयटी क्षेत्रात काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची आणि मुलांना गणित शिकवण्याची इच्छा आहे.
- अथर्व नाडकर्णी