महानगरपालिकेच्या बैठकीत प्रचंड गोंधळ

मुख्य मार्केट संकुल, नॅशनल थिएटरच्या जागेत प्रकल्प, जीसुडा सल्लागार नियुक्ती यावरून खडाजंगी


23rd September 2021, 01:07 am
महानगरपालिकेच्या बैठकीत प्रचंड गोंधळ

महानगरपालिकेच्या बैठकीत प्रचंड गोंधळ
मुख्य मार्केट संकुल, नॅशनल थिएटरच्या जागेत प्रकल्प, जीसुडा सल्लागार नियुक्ती यावरून खडाजंगी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :

येथील मुख्य मार्केटच्या तिसर्र्‍या संकुल, तसेच जीसुडाच्या सल्लागाराची नियुक्ती, तसेच नॅशनल थिएटरच्या जागेत बांधण्यात येणार्‍या दुसर्‍या प्रकल्पाचा प्रस्ताव अशा अनेक विषयांवरून बुधवारी झालेल्या पणजी महानगर पालिकेच्या बैठकीत काही काळ गदारोळ झाला.
माजी महापौर उदय मडकईकर तसेच माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात आणि मनपा आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांना या  विषयावरून धारेवर धरले. तसेच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये काही काळ वाद निर्माण झाला.
करोनामुळे अनेक महिने मनपाची बैठक झाली नव्हती. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत विविध विषयांवरून बैठक तापली. पणजी मार्केटचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक बैठकीमध्ये वादाचा मुद्दा ठरत आहे. बुधवारच्या बैठकीतही पणजी मार्केटवरून वाद निर्माण झाला. पणजी मार्केटच्या तिसर्‍या संकुलाच्या प्रस्तावाला उदय मडकईकर आणि फुर्तादो यांनी विरोध केला. गेली अनेक वर्षे मार्केटमधील दुकानदारांचा प्रश्न सुटत नाही. दुकानदारांचे प्रश्न अगोदर सोडवा. या संकुलात कुणाला दुकाने देणार, यात स्थानिकांना प्राधान्य की परप्रांतीयांना याची यादी अगोदर जारी करावी नंतर हे संकुल उभारावे, असे यावेळी त्यांनी महापौर आणि आयुक्तांना सांगितले. यावेळी मार्केट समितीचे अध्यक्ष प्रमय माईणकर यांनी मडकईकर आणि फुर्तादो यांच्या प्रस्तावाला विरोध केला. हे संकुल पणजीवासीयांसाठी आहे. यात पणजीतील लोकांची सोय होणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
पणजी शहराचा विकास करण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत एका समितीची नियुक्ती केली असतानाही आता जीसुडाचा नवीन सल्लागार नेमण्यात येत असल्याने त्यालाही विरोधकांनी विरोध केला. जीसुडाचा सल्लागार नेमण्याची गरज नाही. जर सल्लागार नेमण्यात येत असेल तर त्यासाठी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करावे. यात मनपाला तसेच सर्व नगरसेवकांना विश्वासात घ्यावे. याविषयी विरोधकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप यावेळी विरोधी गटाचे नेते सुरेंद्र फुर्तादो यांनी केला.


पणजीत होणार ग्रीन बेल्ट
पणजी शहरात आता पर्यटन खात्याअंतर्गत ग्रीन बेल्ट तयार होणार आहे. या अंतर्गत विविध सुशोभीकरणाची कामे केली जातील, तसेच नवीन प्रकल्प उभारले जाणार आहेत. यात करंजाळे उद्यानाचे सुशोभीकरण, पणजी मुख्य चर्चचे सौंदर्यीकरण, वॉक-वे, फिशिंग जेटीचा विस्तार, पदपथांचा विकास, ई-बाईक स्टँड, लँडस्केपिंग असे अनेक प्रकल्प यामध्ये येणार आहेत.



नव्या प्रकल्पावरून वाद
पणजीची ओळख असलेल्या सिने नॅशनल थिएटरच्या जागी आता नवा प्रकल्प प्रस्तावाच्या विषयावरून मोठी खडाजंगी उडाली. नॅशनल थिएटर बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे. आपण महापौर असतानाही नॅशनल थिएटर बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव होता, पण आम्ही तसे करू दिले नाही. पण आता मनपा हे थिएटर बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव रचत आहे. २०१५ साली या थिएटरचा भाडेकरार संपुष्टात आला होता. तेव्हापासून नॅशनल थिएटर बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव सुरू आहे. पण आम्ही याला विरोध करणार. नॅशनल थिऐटर ही पणजीची ओळख आहे, असे मडकईकर यांनी या बैठकीत सांगितले.

हेही वाचा