पांगिरा: वेध गावपांढरीच्या अंतरंगाचा

महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा साहित्याच्या आधारे आढावा घ्यायचा झाला तर शाहीर आण्णा भाऊ साठे, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, नागनाथ कोतापल्ले, द. ता. भोसले, द. मा. मिरासदार, आनंद यादव अशी कितीतरी नावं झर्रकन डोळ्यांसमोर येतात. धरणग्रस्तांच्या वेदना ‘झाडाझडती’मधून शब्दबद्ध करणारे विश्वास पाटीलही यांपैकीच एक. विश्वास पाटलांच्याच ‘पांगिरा’ या कादंबरीवर ‘जोगवा’फेम दिग्दर्शक राजीव पाटील यांनी २०११मध्ये ‘पांगिरा’ हा चित्रपट बनवला. बदलत्या गावपांढरीतल्या राजकीय कुरघोड्या आणि फुकाच्या झगमगाटापायी मुलभूत सुविधांकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्ष्यावर हा चित्रपट बोट ठेवतो..

Story: मनोरंजन/ प्रथमेश हळंदे |
18th September 2021, 11:06 pm
पांगिरा: वेध गावपांढरीच्या अंतरंगाचा

माज्या पांगिराच्या रानी

झुळू झुळू वाहतं पाणी,

गवत नाचती हिरव्या रानी

झाडं डुलतं पानुपानी

मोर लांडुर गाती गाणी

माज्या पांगिरच्या रानी”- विश्वास पाटील (कादंबरी: पांगिरा)

कॉलेजमध्ये असताना अचानक हाती लागलेलं ‘झाडाझडती’ वाचल्यानंतर विश्वास पाटलांची इतर पुस्तकं हुडकू लागलो नि ‘पांगिरा’ गवसला. 

बदलत्या गावपांढरीची कहाणी सांगणारा ‘पांगिरा’.

गावकी नि भावकीतलं मुरलेलं पाणी जोखणारा ‘पांगिरा’.

एकेका पानासरशी, पात्रासरशी वाचकाच्या मनात घर करणारा 'पांगिरा'.

‘पांगिरा’ कादंबरीत ग्रामीण जीवनाचं इतकं वास्तवदर्शी चित्रण केलंय विश्वास पाटलांनी की आपल्याच गावात, आपल्याच माणसांत लपलेले मुरार पाटील, सोकाजी आबा, ज्ञानू सावळा, तान्या भिलारे, विचारे गुरुजी आपल्याला पुन्हा नव्याने दिसू लागतात. गाव पांगिरा नि देव सिदुबा भासू लागतो. आपल्या गावांची अवस्थाही पांगिऱ्यापेक्षा फार काही वेगळी नाही ही सल जाणवत राहते.

‘सावरखेड एक गाव’, ‘जोगवा’, ‘सनई चौघडे’, ‘७२ मैल-एक प्रवास’, ‘वंशवेल’सारख्या दर्जेदार कलाकृती चित्रपटसृष्टीला बहाल करणाऱ्या राजीव पाटलांनी २०११ साली भली मोठी स्टारकास्ट घेऊन ‘पांगिरा’ बनवला. त्याच महिन्यात रिलीज झालेल्या ‘बालगंधर्व’च्या झंझावातापुढे त्याला ‘जोगवा’ अथवा ‘७२ मैल..’सारखी फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. किशोर कदम, शशांक शेंडे, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, उपेंद्र लिमये, मीता सावरकर, हेमांगी कवी आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, स्मिता तांबे अशी भरभक्कम स्टारमंडळी असलेल्या ‘पांगिरा’चा खरा नायक आहे पांगिरा गाव नि त्याची नायिका म्हणजे त्यातली गावपांढर, गावकी. शेजारची डोंगरवाडी सहनायिका. राजकारण्यांच्या लेखी आवडती-नावडतीसारखं ह्या दोन्ही गावपांढऱ्यांचं नातं. ‘कहने को जश्ने बहारा है’ अशी निसर्गकृपा गावाला लाभलीय पण वर्षानुवर्षं गावातल्या राजकारणासारखीच खालावत चाललेली भूजल पातळी ही ह्या गावपांढरीला लागलेली कीड गावच्या विकासाला खीळ घालत आलीय.

कादंबरी चित्रपटामध्ये रुपांतरीत करताना राजीव पाटलांनी सुमित्रा या पात्राचा नव्याने समावेश केलेला आहे. या सुमित्राच्या नजरेतून राजीव पाटील आपल्याला पांगिऱ्याचं गावपण दाखवतात. गावात जुन्या झाडांची होणारी कत्तल, ती थांबवण्यासाठी गावकऱ्यांची होणारी धडपड तर त्या कत्तलीतून नफा मिळवण्यासाठी गावपुढाऱ्यांमध्ये लागलेली चढाओढ, ‘लोकशाय’च्या नावाखाली गावपुढाऱ्यांना हाताशी धरून सरकारी योजनेची मलई लाटणाऱ्या भिकूआण्णासारख्या लबाडांची चलती अश्या कैक प्रसंगांमधून आपल्याला पांगिऱ्यात सुरु असलेल्या स्थानिक राजकारणाची प्रचीती येते. पोळ्याच्या बाजारात जनावरांच्या खरेदीविक्रीचे होणारे घोटाळे, गावकीच्या भांडणात सामोपचारासाठी पुढाकार घेणारी नि आपल्या घराच्या वाटण्या होत असताना हताशपणे बघत बसणारी जुनी पिढी, हातात आलेल्या मोबाईल आणि गाडीला प्रगती समजून तोऱ्यात मिरवणारी तरुण पिढी, सरतेशेवटी घाम गाळून पिकवलेल्या शेतीमालाला योग्य दर मिळत नाही म्हणून ढसढसा रडणारे गावकरी प्रेक्षकांच्या मनावर पांगिऱ्याचा ठसा उमटवून जातात.

अभिनयाच्या बाबतीत सर्वांचंच काम अगदीच चोख झालंय. प्रत्येकाने त्याच्या वाटेला आलेल्या भूमिकेला तिची लांबी नजरेआड करून आपल्या सुरेख अभिनयाने अतिशय योग्य न्याय दिलाय. चित्रपटातला एकेक प्रसंग ह्या सर्व कलाकारांनी अतिशय आत्मीयतेने साकारलाय. “पाखराच्या चोचीतलं दानं आनी लेकराच्या व्हटातलं गानं आयुष्यभर सांभाळून ठेवील, असं काहीतरी बीबियाणं शोधून काढ सुमित्रा” म्हणत रडणारा किशोर कदमांचा सरपंच सोकाजीआबा जितका लक्षात राहतो, तितकीच छाप “माझी रयत, माझी रयत” म्हणून पांगिरकरांना अजगरागत आवळून ठेवणारा उपेंद्र लिमयेचा आमदार भोसलेही पाडून जातो. डोंगरवाडीला नेहमीच मिळणारी सावत्रपणाची वागणूक शशांक शेंडेंच्या बत्ताशामध्ये साफ झळकते. भरमसाठ खर्च करून, भावाच्या विहिरीला लागून बोर मारल्यानंतरही पाणी न लागल्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबला जाऊन आक्रोश करणारा चिन्मयचा धुळा. गावचं भलं करण्याच्या नावाखाली स्वतःची घरं भरणारी किशोर कदमांचा सोकाजी देशमुख नि संतोष जुवेकरचा तान्या भिलारे ही पात्रं. विशेष कौतुक करावं असा स्मिता नि हेमांगीचा हौसा व जना ह्या व्यक्तिरेखांचा सशक्त अभिनय. सगळं काही उत्तम जमून आलंय. क्रिएटीव्ह लिबर्टी म्हणून घेतलेलं सुमित्रा हे कादंबरीबाहेरचं पात्र मीता सावरकरने उत्तम साकारलंय.

निदा फाजलींच्या ‘गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला, चिडियोंको दाने बच्चोंको गुडधानी दे मौला’ ह्या ओळींना घेऊन पांगिराचं थीम सॉंग बनवलं गेलंय. पांगिरा नि डोंगरवाडीचा संघर्ष अधोरेखित करणारं ‘घाव पडला पडला पाण्याच्यापायी’ आणि गावच्या आशा जागवणारं ‘दिस अल्लाद पळंल’ ही विजय नारायण यांनी संगीतबद्ध केलेली दोन्ही गाणी आणि त्यांचं चित्रण अगदी समर्पक आहे. ‘घाव पडला’साठी संगीतकार अजय गोगावलेने आवाज दिलाय. पांगिरा आपलाच गाव आहे असं भासवणारा अमलेंदू चौधरी सरांचा कॅमेरा गावातून, घरातून, शेतातून, बाजारातून जितका सहज फिरलाय तितक्याच खोलवर तो गावकी-भावकीत, बांध-बंधाऱ्यांवर, गुरांच्या जत्रेत, हळव्या कांद्यात नि दंगलीत उधळलेल्या त्याच कांद्यांच्या फोलपाटातही खोलवर शिरलाय. ही अशी भरभक्कम पायाभरणी असलेल्या ह्या चित्रपटाचा कळस म्हणजे चित्रपटाची पटकथा, संवाद नि गाणी लिहणारे संजय पाटील यांची ‘ह्या रांडमुंड वस्त्या’ ही कविता चित्रपटाच्या शेवटी प्रमोद पवार यांच्या आवाजात मोनोलॉग म्हणून घेतलीय. त्यावेळचं ते दृश्य, तो आवाज नि ती कविता. सारं काही मनाच्या सात पुरुष खोल पांगिरडोहात खोलवर रुतत जातं.

मूळ कादंबरी नि चित्रपट ह्यात जरी फरक असला तरीही दोन्ही आपापल्या जागी उत्तम आहेत. राजीव पाटलांचं नेहमीसारखंच झकास दिग्दर्शन, संजय पाटलांचे ग्रामीण भाषेतील खास म्हणी व वाक्प्रचार पेरलेले खुमासदार संवाद, विजय नारायण यांचं परिणामकारक पार्श्वसंगीत आणि सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय ह्या साऱ्या जमेच्या बाजूंमुळे चित्रपट एकदम दर्जा झालाय. चित्रपट कादंबरीइतका जरी प्रभावी बनला नसला तरीही एकदा का होईना पण बघण्यासारखा जरूर आहे. हा चित्रपट फॅमिलीसोबतही बघण्यासारखा आहे. मला आवडलाय, तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो. नक्की बघा.