Goan Varta News Ad

नेमेची येतो पावसाळा...

गोवा

Story: अंतरंग | गणेश जावडेकर |
22nd July 2021, 12:10 Hrs
नेमेची येतो पावसाळा...

महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याामुळे राज्यात सध्या जोरदार वृष्टी होत आहे. सतत आठवड्याहून अधिक काळ पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यत: सकाळच्या वेळी जे कोण दुचाकी घेउन पणजीत कामासाठी येतात, त्यांचे तर हाल पहावेनासे झाले आहेत. पाऊस आणी वाऱ्यामुळे रेनकोट घालून दुचाकी चालविताना त्रेधातिरपीट उडते. सकाळी पाऊस सुरू झाला की नउच्या सुमारास रस्ते पाण्याखाली जातात. पाण्यात प्रामुख्याने दुचाकीस्वारांना मार्ग काढणे कठीण जाते. रस्ते पाण्याखाली जाण्याची समस्या असतानाच खड्ड्यांची समस्या निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे पणजीसह सर्व शहरातील प्रमुख रस्ते उखडून गेले आहेत. रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. पाऊस पडला की ह्या खड्डयात पाणी साचते. दुचाकीस्वारांना पाण्यामुळे खड्डे दिसत नाही आणि येथेच अपघात घडण्याची शक्यता वाढते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बरेच अपघात होतात. सखल भागातील काही रस्त्यांची तर चाळण झाली आहे. सततच्या पावसामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडतात व वाहतुकीचा खोळंबा होतो. फांद्या वीजवाहिन्यावर पडल्या तर वीज प्रवाह खंडीत होतो. ह्या समस्यांपेक्षा रस्त्यावर खड्डे पडण्याची समस्या गंभीर आहे. ह्यामुळे अपघात घडून हकनाक जीव जाण्याची शक्यता असते. रस्त्यावर निर्माण होणाऱ्या खड्यांची समस्या नवीन नाहीच. तसेच ही समस्या यंदाच निर्माण झालेली नाही. गेल्या वर्षीही ही समस्या होती, त्याच्या आदल्या वर्षीही होती, पुढील वर्षीही...

ही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यत: सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रयत्न करायला हवे. हे प्रयत्न होत नाहीत, हेच दुर्दैव आहे. खड्ड्यांमुळे अपघात घडला, कोणा निष्पापाचा बळी गेला की हळहळ व्यक्त होते. खड्ड्यांची चर्चा होते. अपघातास कारण ठरलेल्या खड्ड्यांसह अन्य काही खड्डे बुजविले जातात. नंतर सर्व काही विसरले जाते. पुढच्या वर्षी पावसाळा आला की पुन्हा रस्त्यावर पूर्वीसारखे खड्डे तयार होतात. हे दुश्टचक्र थांबविण्याची गरज आहे. 

गेल्यावर्षी रस्त्यावरील खड्ड्यांविशी विधानसभेत दीर्घ चर्चा झाली होती. चर्चेनंतर खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू झाली. सर्व खड्डे बुजविण्यात आले होते. पण उपयोग काय. यंदा पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. सखल रस्त्यावर जेथे पाणी साचून राहते तेथे खड्डे तयार होतात. आज विज्ञान आणी तंत्रज्ञानाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. पाणी साचून राहिले तरी रस्त्यावरील डांबर वा खडी उखडून जाणार नाही, असें तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदारांना रस्त्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यायला हवे. ह्या कामी अभियांत्रिकी महाविद्यालय, आयआयटी तसेच एनआयटी सारख्या संस्थांची मदत घेण्यास हरकत नाही. पावसाळ्यात नेमेची पडतात खड्डे....असा प्रकार होता कामा नये.