Goan Varta News Ad

रस्त्यासाठी पर्यायी व्यवस्था करणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आश्वासन

|
22nd June 2021, 11:50 Hrs
रस्त्यासाठी पर्यायी व्यवस्था करणार

कोलवाळ येथे महामार्गावरून अंतर्गत रस्त्याच्या पाहणीवेळी अधिकार्‍यांना माहिती देताना किरण कांदोळकर. सोबत कपिल फडते, कविता कांदोळकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व रहिवासी.


प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : कोलवाळ येथे बिनानीजवळ आवश्यक पर्यायी व्यवस्था करून दिली जाईल, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संयुक्त पाहणीवेळी दिले आहे. जिल्हा पंचायत सदस्या कविता कांदोळकर यांच्या निवेदनाच्या आधारे उपजिल्हाधिकार्‍यांनी संयुक्त पाहणी केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी कपिल फडते, जि. पं. सदस्य कविता कांदोळकर, माजी आमदार किरण कांदोळकर, थिवी मतदारसंघातील सरपंच, पंच सदस्य व रहिवासी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणावेळी कोलवाळ गावात जाणार रस्ता खोदण्यात आला आहे. पावसामुळे रस्ता चिखलमय होऊन खचला आहे. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनून अपघात केंद्र बनला आहे. कोलवाळ तसेच रेवोडा, नादोडा, पीर्ण व इतर भागातील लोक या रस्त्याचा उपयोग करीत असून यामुळे या भागातील लोकांची गैरसोय होत आहे. एकादा मोठा अपघात होण्यापूर्वी या रस्त्यावर आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कविता कांदोळकर, किरण कांदोळकर व स्थानिकांनी केली. त्यानुसार महामार्ग प्राधिकरणाचे अभियंत्यांनी येत्या आठ दिवसांत या ठिकाणी आवश्यक उपाययोजनेनुसार पर्यायी व्यवस्था करण्याची हमी उपजिल्हाधिकार्‍यांना दिली.

जि.पं. सदस्य कांदोळकर यांनी याठिकाणी वाहनस्वारांची गैरसोय असून यावर संयुक्त पाहणी करून तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाने पर्यायी व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले आहे. _कपिल फडते, उपजिल्हाधिकारी