भाजपतर्फे राज्यात बलिदान पंधरवडा

६ जुलैपर्यंत वृक्षारोपण, प्लास्टिक हटाव मोहीम


22nd June 2021, 11:47 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : भाजपतर्फे २१ जून ते ६ जुलै हा पंधरावडा बलिदान पंधरावडा म्हणून पाळण्यात येत असून या पंधरावड्यात राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्पाधिकारी गोरख मांद्रेकर यांनी दिली.
हा जागतिक योगदिन म्हणून पाळला जातो. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी योगाचे महत्त्व जगाला पटवून दिले. हा ऐतिहासिक दिवस असून सुवर्णाक्षरांनी त्याची नोंद व्हायला हवी, असे प्रतिपादन भाजपाचे गोव्यासाठी नियुक्त केलेले प्रकल्प अधिकारी गोरख मांद्रेकर यांनी केले.
मंगळवारी येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर, दक्षिण गोवा प्रमुख शर्मद रायतूरकर व माजी नगरसेवक राजसिंह राणे उपस्थित होते. हा पंधरावडा २१ जून रोजी जागतिक योगदिनी सुरू करण्यात आला आहे. योगामुळे मनःशांती, रोग प्रतिकारक शक्ती तसेच एकाग्रता प्राप्त होते व शरीर निरोगी राहते. यंदा करोनामुळे मोठे कार्यक्रम आयोजित केले नसले तरी उत्तर गोव्यात ५५, तर दक्षिण गोव्यात ४७ योग कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. उत्तर गोव्याचे प्रमुख म्हणून गुरुप्रसाद पावसकर तर दक्षिण गोवा प्रमुख म्हणून शर्मद रायतूरकर यांनी काम पाहिले, असे मांद्रेकर यांनी सांगितले.
२५ जून हा देशात आणीबाणी जाहीर केलेला दिवस. हा काळा दिवस म्हणून पाळला जाईल. दि. २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात हा कार्यक्रम, दि. ६ जुलै रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी केली जाईल. दि. २३ जून ते ६ जुलै या कालावधीत वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक पिशव्या हटाव मोहीम हाती घेतली जाईल, जनतेने यास सहकार्य करावे, असे आवाहन रायतूरकर यांनी केले.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मरणार्थ आज बलिदान दिवस
शर्मद रायतूरकर यांनी २१ जून ते ६ जुलै दरम्यानच्या पंधरावडा कार्यक्रमाची माहिती दिली. दि. २३ जून रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मरणार्थ बलिदान दिवस पाळला जाईल. डॉ. श्यामाप्रसाद हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. पण नेहरूंनी देशासाठी अहितकारी निर्णय घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. देशाच्या सार्वभौमत्वावर गदा येण्याचे प्रकार घडू लागले. तेव्हा त्यांनी विरोध केला. फारुख अब्दुला सरकारने काश्मिरमध्ये त्यांना अटक केली व त्यांचा तुरुंगात छळ केला. तिथेच ते गतप्राण झाले. म्हणून हा बलिदान दिवस म्हणून पाळला जातो.