देवचाफा कसा अगदी अंगणातला प्रिय सखा, मित्र, अभिसारिकेच्या विरहाचा चिरंतन साथीदार, विरहिणी आपल्या मनातले गुज याला सांगते आणि तोही ते ऐकून घेतो. फुलतो, बहरतो, दुःखी होतो आणि आधार बनतो विरहातला...
प्लु मेर नावाच्या एका वानसिकाला एक भविष्यवेत्ता भेटला. प्लुमेरने त्याला विचारले, मला सोन्याची नाणी देणारा वृक्ष कुठे सापडेल? मी बरेच ऐकून आहे त्याबद्दल. भविष्यवेत्ता म्हणाला, दूर भारतात तुला हे झाड सापडेल. त्याने सांगितलेल्या खाणाखुणा शोधत प्लुमेर भारतातल्या दक्षिण भागात पोहचला. चौकशी केल्यावर कुणीतरी त्याला एका देवळाशेजारी आणून सोडले. तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा होता. त्या देवळाच्या आवारात एक मोठे देवचाफ्याचे झाड होते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात खरोखरच ते झाड सोन्यासारखे चमकत होते आणि वातावरणात एक मंद, गोड, काहीसा गूढ वाटावा असा सुगंध पसरला होता. प्लुमेरने झाड हालवले त्याला वाटले सोन्याची नाणी पडतील, पण त्याऐवजी शुभ्र पांढरी, मध्यभागी पिवळाजर्द रंग असणारी फुले पडली जे बघताना सोन्याची नाणीच पडल्याचा भास होत होता. या झाडाला भेटून प्लुमेर आनंदित झाला आणि प्रसिद्ध वानसिक बनला. ही आहे आपल्या देवचाफ्याभोवती गुंफलेली रंजक दंतकथा. खरंच चाफा म्हटलं की सर्वसाधारणपणे या फुलांचं चित्र समोर येतं. प्रत्येक देवळासमोर, जुन्या वाड्यासमोर, एखाद्या स्मशानात शांत बसलेल्या योग्यासारखा, विचित्र आकाराच्या जुनाट चाफ्याचे स्मरण होते. लालसर छटा असणारा आणि पांढरा पिवळा चाफा कितीही वेळ बघत राहिले तरी तृप्ती होतच नाही. त्याचा तो मंद वास मनाच्या सगळ्या भावनांना उघड करतो. ह्रदयातील तारांना हलकेच छेडतो. आधीच संवेदनशील असणाऱ्या मनात शब्द जागवतो आणि कथा, कविता, चित्र, शिल्प अशा अभिव्यक्तीच्या रुपात प्रकट होतो. गोव्यातल्या लोकगीतामध्ये हमखास सापडणारा चाफा तो हाच. 'चाफे गळता माटवान कयर जाता' असे याचे वर्णन जात्यावरच्या ओव्यातून दिसून येते. सोनचाफा तसा रूपाने, गंधाने उजवाच पण तो शापित अप्सरेसारखा भासतो. देवचाफा कसा अगदी अंगणातला प्रिय सखा, मित्र, अभिसारिकेच्या विरहाचा चिरंतन साथीदार, विरहिणी आपल्या मनातले गुज याला सांगते आणि तोही ते ऐकून घेतो, फुलतो, बहरतो, दुःखी होतो आणि आधार बनतो विरहातला.
पण तुम्हाला माहीत आहे का? बऱ्याच झाडांप्रमाणे हे झाड ही विदेशातून आलेले आहे. सगळ्यांच्या जवळचा चाफा विदेशी? थोडा धक्काच बसेल, पण हे सत्य आहे. मूळ मेक्सिको, केरेबिअन, दक्षिण आणि मध्य अमेरिका इथल्या बेटावरच हे झाड. प्लुमेर या वनस्पतीशास्त्रज्ञानं १७ शतकात याचा शोध लावला. पुढे लिनेनिअसने प्लुमेरच्या सन्मानार्थ याचे शास्त्रीय नाव ठेवले प्लुमेरिया. आल्बा (पांढरा), प्लुमेरिया रुबरा(लाल). कणेर, आटकी, अनंत अशा चीक असणाऱ्या झाडांच्या कुळात देवचाफा येतो. फ्रांगीपानी या नावानं त्याला जगभर ओळखतात. मर्क़ुस फ्रंगीपनी नावाच्या एका इटालियन माणसाने या नावाने बनवलेल्या अत्तराला देवचाफ्याचा वास येतो म्हणून त्याला फ्रांगीपानी हे नाव पडलं. क्षीरचंपा, गुलचीन, कोडू साम्पिगे अशी त्याची आणखी नावं आहेत.
मायन आणि अझेटेक संस्कृतीमध्ये या फुलाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यांच्या कलाकृतीमध्ये, औषधी उपयोगामध्ये चाफ्याचा खूप वापर व्हायचा. तर अशा या प्रदेशातला चाफा जगभर सर्वांचा लाडका आहे. पुढे धर्मप्रसारक आणि विविध व्यापारानिमित्त फिरताना पोलिनेशिया वैगरे भागातून ऑस्ट्रेलिया आणि इतर देशामध्ये हा पोहचला. जावा आणि बाली, हवाई बेट तसेच श्रीलंका आणि भारत देशात तो बुद्ध भिक्खुंनी आणला असावा. कारण बुद्ध धर्मासाठी चाफा महत्त्वाचा आहे. पण १७ व्या शतकानंतर नव्हे तर त्याच्याही पूर्वीपासून चाफा भारतात आणला गेला आहे. जहांगीर नामा या जहांगीर बादशहाच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. तसेच मुगल आणि राजपूत स्थापत्य कलेत देवचाफ्याचा उपयोग कलाकृतीसाठी दिसून येतो. मणिपूरमध्ये चाफ्याला खेगी लेहिओ म्हणतात. त्यांच्या मान्यतेप्रमाणे १२ व्या शतकात चीनच्या खेगी जमातीने मणिपूरच्या मेतेही जमातीवर हल्ला केला, ज्यात खेगी राजा हरला आणि तह करण्यासाठी स्वतः मेतेही राजाला भेटण्यास आला. त्यावेळी आणलेल्या वेगवेगळ्या अमुल्य भेटींमध्ये देवचाफाही होता, म्हणूनच त्याला खेगी लेहिओ असे म्हटले जाते. त्यांच्या मते, हा चाफा दोन्ही जमातींच्या समन्वयाचे प्रतीक आहे. चीनमध्ये चाफा तसा कमीच आढळतो त्यामुळे, या झाडाची भेट देणे हे त्या व्यक्तीला अगदी प्रिय किंवा अतिमहत्त्वाचा दर्जा देणे असे समजले जाते. बौद्ध धर्मात याला पवित्र, चिरंतन मानले गेले म्हणून प्रत्येक पगोडाच्या बाहेर देवचाफा असतो. पगोडा चंपा हे नाव या वरूनच पडले असावे. श्रीलंकेतील पनस मल याचा अर्थच देवळातील चाफा असा होतो. थाईलंड आणि बऱ्याच देशात याला भूतांचे झाड समजले जाते. काही धर्मांमध्ये चिरंतन रहाणारे झाड म्हणून स्मशानभूमीत हे लावले जाते. हवाई देशात याच्या फुलांच्या माळा घालून स्वागत केले जाते. याचा अर्थ तुम्ही आलात आम्हाला खूप आनंद झाला, आपण आम्हाला प्रिय आहात असा होतो. पोलिनेशियन विवाह इच्छूक बायका या फुलांचा वापर करतात. ही फुलं उजव्याबाजूला माळली तर अविवाहित आणि डाव्या बाजूला माळल्यास विवाहित स्त्री आहे हे समजले जाते. दक्षिण कर्नाटक भागात विश्वासार्हता आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पांढऱ्या चाफ्याच्या माळा लग्नात वापरल्या जातात.
जगभर देवचाफ्याच्या सात ते आठ जाती आहेत. आतातर खूप रंग आणि रुपामध्ये देवचाफा उपलब्ध आहे. आपल्या देशात या झाडाला फळ धारणा होत नाही. याचे परागीकरण करण्यासाठी जे पतंग किडे लागतात, ते आपल्या देशात नसावेत. झाडचा चीक विषारी असतो. चाफ्याच झाड अगदी उपटून फेकून दिलं तरीही पुनर्जीवित होतं. एवढंच काय, ही झाडं ५०० डिग्री सेलसियसच्या तापमानात जळू शकतात. नैसर्गिक कुंपणासाठी उत्तम असे हे झाड आहे. साहित्यिकांच्या अगदी जवळचा असा विषय आहे चाफा.
तर असा हा प्रिय चाफा... चिवट, चिरंतन आनंद प्रेम देणारा देवचाफा ... कितीही संकटे आली तरीही हसत रहा, आपली स्मृती, कार्य, चिरंतन या जगात पसरत रहा असा संदेश देणारा योगीच.....