तेरा कोविडबळींत चार तरुण

नवे ४१३ रुग्ण; एकूण मृत्यू २,८९१, सक्रिय बाधित ५,६०५


10th June 2021, 10:24 pm
तेरा कोविडबळींत चार तरुण

फोटो : संग्रहित
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : प्रत्येकी ३३ वर्षीय तरुण, तरुणी तसेच ३५ व ३६ वर्षीय तरुण अशा चौघांसह आणखी १३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. बुधवार आणि गुरुवारच्या २४ तासांत नवे ४१३ करोनाबाधित सापडले. बाधित आणि मृत्यूंची संख्या घटत असली तरी अवघ्या ३३ ते ३६ वर्षे वयोगटातील चौघांचा मृत्यू झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे.
नार्वे येथील ३३, काणकोण येथील ३५, हळदोणा येथील ३६ वर्षीय तरुण, बागा येथील ६७, पाळीतील ७२, बोरी येथील ८९ वर्षीय पुरुष तसेच सिंधुदुर्ग येथील ३३ वर्षीय तरुणी, काणकोण येथील ७३, आगाळी येथील ६७, कुडतरी येथील ७०, सावंतवाडी येथील ५२, शिवोली येथील ७६ आणि टोंक येथील ६४ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. १३ पैकी ७ जणांचे गोमेकॉत, दोघांचे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात, तर दक्षिण आणि उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळांत प्रत्येकी दोघांचे निधन झाले, अशी माहिती आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालातून दिली आहे.
बुधवार आणि गुरुवारच्या चोवीस तासांत ५८५ जणांनी करोनावर मात केली. ८६ जणांना कोविड इस्पितळांतून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या ५,६०५ झाली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा २,८९१ झाला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांची संख्या १,६१,१५३ झाली​ आहे. त्यांतील १,५२,६५७ जणांनी करोनावर मातही केली आहे.
......................................................
सक्रिय बाधितांचा आकडा घटता
गेल्या काही दिवसांत करोनाबाधितांची संख्या कमी होऊन करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बहुतांशी शहरांतील सक्रिय बाधितांची संख्या कमालीची घटली आहे. १५ दिवसांपूर्वी सक्रिय बाधितांत अव्वल असलेल्या मडगावात गुरुवारी ३८५ सक्रिय बाधित होते. सद्यस्थितीत सर्वा​धिक सक्रिय रुग्ण (५३५) फोंड्यात आहेत. त्यानंतर मडगाव, पणजी (२७९), चिंबल (२६२), साखळी (२१९), कुठ्ठाळी​ (२१८), पर्वरी (२१०), पेडणे (२०१), कांदोळी (१८८), कुडचडे (१८६), कासावली (१८५) या शहरांचा क्रमांक लागतो.