लॉकडाऊनऐवजी स्टेप अप इस्पितळे उभारा!

डॉ. मधु घोडकिरेकर यांचा पालिका, पंचायतींना सल्ला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May 2021, 12:02 am
लॉकडाऊनऐवजी स्टेप अप इस्पितळे उभारा!

पणजी : पालिका, पंचायतींनी लॉकडाऊन जनजागृतीसाठी करावा. कडक लॉकडाऊनऐवजी आपापल्या क्षेत्रांत स्टेप अप इस्पितळे उभारून तेथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांच्या सहकार्याने को​विड बाधितांवर उपचार सुरू करावेत, असा सल्ला डॉ. मधु घोडकिरेकर यांनी दिला.
राज्यातील बऱ्याच पालिका, पंचायती करोनामुक्तीसाठी लॉकडाऊन करीत आहेत. लॉकडाऊन काळात सकाळच्या सत्रात चार-पाच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देत आहेत. पण, त्यामुळे अनेक नागरिकांना आवश्यक साहित्य मिळण्यास अडचणी होत आहेत. असे नागरिक शेजारील शहरांत साहित्य खरेदीसाठी जात असून, त्यामुळे तेथील दुकानांवरील गर्दी वाढून करोना प्रसार आणखी वेगाने होत आहे. त्यामुळे पालिका, पंचायतींनी लॉकडाऊनमधील निर्बंधांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
लॉकडाऊन नकोच, असे आपले मत नाही. पण लॉकडाऊनचा विचार केवळ जनजागृतीसाठी करण्यात यावा. करोना प्रसार रोखण्यासाठी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, पार्ट्या आदी गर्दी जमवणारे कार्यक्रम पूर्णपणे बंद करावे. सद्यस्थितीत करोनाबाधित रुग्णांना तत्काळ उपचार कसे मिळतील, त्यांचे जीव कसे वाचतील याचा अधिक विचार पालिका, पंचायतींनी करावा. त्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रांत स्टेप अप इस्पितळे उभारावी. आयएमएच्या डॉक्टरांच्या सहकार्याने तेथे करोनाबाधितांवर तत्काळ प्राथमिक उपचार सुरू करावे, असे डॉ. घोडकिरेकर म्हणाले.
करोना शहरांतून गावांत पोहोचला आहे. अशावेळी दुकाने चार-पाच तास बंद ठेवून काहीही होणार नाही. बाधितांचे जीव वाचवणे हेच लक्ष्य ठेवून पालिका, पंचायतींनी कामाला लागले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
मृतदेहापासून संसर्ग होत नाही!
करोनाबाधित मृतदेहांना हाताळण्यासाठी नागरिक अजूनही तयार नाहीत. मृतदेहापासून करोना संसर्ग होत असल्याची भीती अजूनही लोकांत आहे. पण मृतदेह पिशवीत घालताना तो सॅनिटाईज केलेला असतो. त्याच्यापासून अजिबात करोना संसर्ग होत नाही, असेही डॉ. घोडकिरेकर यांनी स्पष्ट केले.