इभ्रत शिल्लक ठेवली

वेगवेगळ्या आंदोलनांना पाठिंबा देणाऱ्या काही अवघ्या खेळाडूंचा अपवाद वगळता अन्य कुठलेच मोठे खेळाडू देशातील समस्यांविषयी उघडपणे बोलत नाहीत. चुकीचे समर्थन करण्यासाठी मात्र काही स्टार खेळाडू पुढे सरसावतात.

Story: अग्रलेख |
05th May 2021, 12:46 am
इभ्रत शिल्लक ठेवली

आयपीएलला गोंजारण्याची ही वेळ नव्हे. देशात करोनाने हाहाकार माजवला असताना क्रिकेटच्या नावाखाली पैसे कमविण्याचे भूत मानगुटीवर बसलेल्या बीसीसीआयने शिल्लक असलेली इभ्रत वाचवण्यासाठी अखेर आयपीएलचा सुरू असलेला हंगाम रद्द केला. रोज हजारो लोक करोनाच्या संसर्गामुळे मरत आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी रांगा लागल्या असताना आणि मिळेल तिथे अंत्य​विधी करण्यासाठी लोक जागा शोधत असताना आपल्या देशात रिकाम्या मैदानांवर फक्त काही कथित मान्यवरांसाठीच क्रिकेटचा अड्डा सुरू होता. आयपीएलच्या नावाने इतरही अनेक ऑनलाईन जुगाराचे मार्ग गेल्या काही वर्षांत सुरू झाले होते. त्यांचाही धंदा तेजीत होता. गेल्या काही दिवसांपासून जगातल्या कुठल्याच देशात सापडत नव्हते इतके करोना रुग्ण भारतात सापडत आहेत. अनेक राज्यांमध्ये करोना रुग्ण हे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळेच मृत्यू पावत आहेत, असे असताना कुठलाच शोक स्पर्श नसलेल्या आयपीएलमध्ये आनंद साजरा केला जात होता. २००७मध्ये बीसीसीआयने सुरू केलेल्या ह्या नव्या प्रकारामुळे जगातील क्रिकेट क्षेत्रालाच वेगळा आयाम मिळाला असला तरी करोनाचे रुग्ण आणि मृत्यूदर वाढत असताना देशात असे सोहळे आयोजित करणे हे निश्चितच शोभनीय नव्हते. विशेष म्हणजे एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर आणि ९ एप्रिलला आयपीएल सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १० एप्रिलला तो पर्यंतची सर्वांत मोठी करोना रुग्णवाढ देशाने पाहिली होती. त्याच दिवशी ७९४ जणांचा देशात मृत्यू झाला होता. पण, आयपीएल आयोजकांना कसलेच सोयर-सुतक नव्हते. कुठल्याच भारतीय खेळाडूने आयपीएल पुढे ढकला, अशी मागणी केली नाही. वेगवेगळ्या आंदोलनांना पाठिंबा देणाऱ्या काही अवघ्या खेळाडूंचा अपवाद वगळता अन्य कुठलेच मोठे खेळाडू देशातील समस्यांविषयी उघडपणे बोलत नाहीत. चुकीचे समर्थन करण्यासाठी मात्र काही स्टार खेळाडू पुढे सरसावतात.
देश कुठल्या स्थितीतून जात आहे, त्याची कल्पना असतानाही आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाचा बीसीसीआयला सोस लागला होता. काही महत्त्वाचे खेळाडू करोनाची लागण झाल्यामुळे खेळू शकत नाहीत. खेळाडूंसाठी काम करणाऱ्या पथकातले काहीजण पॉझिटिव्ह आढळल्याने एका संघाला विलगीकरणात ठेवावे लागले. कोलकता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू, सीएसकेचा कर्मचारी वर्ग पॉझिटिव्ह सापडला होता. एका टीममधील विदेशी खेळाडूंनी करोनाचे रुग्ण भारतात वाढू लागल्यामुळे संघच सोडण्याबाबत व्यवस्थापनाला कळवले होते. संघाच्या फ्रॅन्चायजीने त्याबाबत बीसीसीआयला कळवले होते. यापूर्वी मॅक्सवेलसारख्या खेळाडूनेही करोनामुळेच भारतात खेळण्यास असमर्थता दर्शवली होती. गेल्याच आठवड्यात सहा खेळाडूंनी आयपीएल सोडण्याविषयी संघांना कळवले होते. शेवटी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आयपीएल सुरू ठेवली तरीही फार महत्त्व येणार नाही, हे लक्षात आल्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचा हंगाम रद्द केला. ९ एप्रिल ते ३० मे पर्यंत आयपीएलचा हंगाम चालणार होता. ५६ पैकी २९ सामने झाले होते. निम्मी स्पर्धा संपल्यानंतर करोनाचा विचार बीसीसीआयच्या डोक्यात येतो, हेही नसे थोडके!
बीसीसीआय दर वर्षीच्या आयपीएल हंगामातून हजारो कोटींचा व्यवहार करते. संघाचे ब्रँड व्हॅल्यू, मुख्य पुरस्कर्ते, इतर पुरस्कर्ते, लाईव्ह प्रसारण अशा वेगवेगळ्या माध्यमांतून हजारो कोटींची उलाढाल होत असते. गेल्या वर्षीच ४ हजार कोटींचा महसूल बीसीसीआयने कमवला होता. यंदा हंगाम अर्ध्यावर थांबवावा लागल्यामुळे बीसीसीआयचा काही महसूल बुडणार आहे; पण निश्चितच फार मोठे नुकसान होणार नाही किंवा रसातळाला जाणार नाही. देश ज्या स्थितीमधून जात आहे त्यात आयपीएलसारखे क्रिकेटचे सोहळे न होणेच माणुसकीचे ठरेल. कारण विदेशातील खेळाडू सुद्धा भारतातील स्थिती पाहून मायदेशी परतत होते, अशा वेळी भारतातील स्थितीची दखल बीसीसीआयने घेणे आवश्यक होते. कारण इतके करण्यावरून तरी बीसीसीआयजवळ संवेदनशीलता आहे हे दिसून आले असते.
रोज देशात साडेतीन ते चार लाखांपर्यंत करोना रुग्ण सापडत आहेत. २ कोटींच्या पार आतापर्यंतचे रुग्ण गेले आणि २.३३ लाख लोकांना आतापर्यंत कोविडमुळे जीव गमवावा लागला. रोज तीन ते साडे तीन हजार मृत्यू करोनामुळे होत आहेत. अशा वेळी करोनाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची देशाला आता खरी गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील ज्या त्रुटींमुळे देशात लोकांचा बळी जात आहे, त्या त्रुटी सुधारण्याची ही वेळ आहे; आयपीएलला गोंजारत बसण्याची नव्हे! देश ह्या महामारीतून सावरला तर आयपीएलचे अनंत सोहळे पुढे सुरू राहतीलच की!