लसीकरणासाठी लोकांना पैसे मोजायला लावणार का ?

आप :गोमंतकीयांना मोफत लस देण्याची सरकारची घोषणा हवेत


04th May 2021, 12:44 am

पणजी : कोविडशी लढण्यासाठी लस ही संजीवनी असून गोव्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला लसीकरणासाठी जास्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सरकार लोकांना खासगी रुग्णालयात जास्तीत जास्त खर्चात लसीकरणासाठी भाग पाडत आहे का, असा प्रश्न आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे.
आपचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या ठीक एक दिवस आधी गोंयकारांना मोफत लस देण्याची मोठी घोषणा केली होती, परंतु ती घोषणा एक निवडणूक जुमलाच ठरली. सरकारने मोफत लस दिली तर नाहीच, शिवाय अद्याप लसीकरण मोहीमही सुरू केलेली नाही. या लसीकरणासाठी १८ ते ४५ वयोगटातील व्यक्ती जे कित्येक दिवसांपासून याची वाट पाहत होते. मात्र, त्यांना लसीकरणासाठी खासगी रुग्णालयात जाण्यास भाग पाडले जात आहे.
दरम्यान, म्हांबरे यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप आणि कोविन पोर्टलवर येणाऱ्या विविध तांत्रिक समस्यांवर प्रकाश टाकला आणि मुख्यमंत्र्यांनी गोंयकारांसाठी ही लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी व जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली.
आरोग्य सेवा संचालनालयाकडे डीडीएसवाय योजनेंतर्गत नोंदणीकृत लोकांचा डेटाबेस आहे. या डेटाबेसच्या माहितीचा वापर करून प्रथम ३५ ते ४५, नंतर २५ ते ३५ आणि शेवटी १८ ते २५ या वयोगटांतील व्यक्तींना संपर्क करून त्यांच्या लसीकरणाची दिनांक, वेळ आणि स्थान माहिती देण्यात यावी, जेणेकरून सुलभता येईल. या अंतर्गत गोव्याच्या संपूर्ण खेड्यात लसीकरण शिबिरे घेण्यात यावी. ही लसीकरण शिबिरे आरोग्य केंद्र किंवा कोविड केंद्राऐवजी सामाजिक सभागृहात आयोजित केली जावीत. कारण आरोग्य केंद्रांमध्ये कोविड चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे लोकांना त्याठिकाणी जाण्यास भीती वाटत असल्याचेही म्हांबरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांच्या आमदारांना, राजकीय पक्षांना सोबत घेऊन लसीकरण मोहिमेबद्दल जनजागृती करावी व लोकांमध्ये लसीकरणाविषयी विश्वासाचे वातावरण तयार करावे. मुख्यमंत्र्यांनी गोयंकरांच्या हितासाठी आपल्या खुर्चीचा वापर करत जास्तीत जास्त लसी खरेदी कराव्या. _ राहुल म्हांबरे, आपचे राज्य संयोजक