मेरशी गोळीबार प्रकरणी ६ रोजी सुनावणी

सरकारी वकिलाने बाजू मांडण्यासाठी मागितला वेळ


04th May 2021, 12:43 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मेरशी येथे ५ एप्रिल रोजी दुपारी गोळीबार झाला होता. या प्रकरणातील संशयित जुझे ऑलिव्हिराने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी सरकारी वकिलाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला आहे. याची दखल घेऊन खंडपीठाने पुढील सुनावणी ६ रोजी ठेवली आहे.
या प्रकरणी प्रसाद फडते यांनी जुने गोवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित जुझे याचा मेरशीत कुक्कूटपालन व्यवसाय आहे. तक्रारदार प्रसाद याचा मित्र नारायण साळकर याचाही कुक्कूटपालन व्यवसाय असून साळकरकडे काम करणारा आणि अचानक काम सोडलेल्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी ते दोघे तिथे आले होते. त्यावेळी प्रसाद व त्याच्या मित्राला तो कर्मचारी संशयित जुझेच्या कुक्कूटपालन केंद्रात भेटला. त्यानंतर कामगार परत साळकरकडे कामावर येण्यास राजी झाला. त्यानुसार, कामगार त्याच्याबरोबर जाण्यास निघाला असता, संशयित जुझे तिथे आला आणि वाद घालू लागला. यावेळी जुझेने त्याच्याकडे असलेले पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. या झटापटीत एक गोळी झाडली असता ती तक्रारदार फडतेच्या हाताला लागली आणि तो जखमी झाला.
दरम्यान, जुने गोवा पोलिसांनी संशयित जुझे ऑलिव्हिराच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित जुझे विरोधात गुन्हा दाखल केला. त्याच दरम्यान संशयिताने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर संशयिताने संबंधित निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी खंडपीठाने ६ रोजी ठेवली आहे.