Goan Varta News Ad

भाजपसाठी निराशाजनक अंदाज

डीएमकेने काँग्रेसशी युती केली होती त्यामुळे स्टॅलीन सत्तेत येणे म्हणजे काँग्रेसला थोडे बळ येणार आहे. तिकडे आसाममध्ये ममता बॅनर्जी आणि केरळात पिनाराई पुन्हा आले तर सध्याची चार राज्ये आणि संघप्रदेशातील निवडणुकीतून भाजपला फारसे काही गवसणार नाही.

Story: अग्रलेख |
30th April 2021, 12:16 Hrs
भाजपसाठी निराशाजनक अंदाज

कोविडचा धोका असतानाही पाच ठिकाणच्या निवडणुका पूर्ण झाल्या. त्याच दरम्यान देशात कधी नव्हे इतका कोविडचा उद्रेक झाला. मद्रास उच्च न्यायालयाने तर कोविडच्या उद्रेकामुळे भारतीय निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असेही मत नोंदवले. त्यानंतर लगेच निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी करून २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी काही शिष्टाचार पाळण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. निवडणुका पुढे ढकलणे शक्य होते पण केंद्र सरकारनेही तशी मागणी आयोगाकडे लावून धरली नाही. ठरल्याप्रमाणे निवडणुका घेतल्या. राजकीय पक्षांनी लाखोंची गर्दी करून प्रचार सभा घेतल्या. या सभांमधूनच करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला, लाखो रुग्ण सापडू लागले. आता तर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली. देश अशा महामारीतून जात असताना भारतीय निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याचे डोहाळे लागले, त्याचे परिणाम म्हणून केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामीळनाडू ह्या राज्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागले आहेत. मृतांचा आकडाही वाढत आहे. देशभर साडेतीन हजाराच्या आसपास रोज कोविडचे बळी जात आहेत. आतापर्यंत मृतांचा आकडा २ लाखाच्या पुढे गेला आहे. दिवसाला एक लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, तामीळनाडू, गुजरात, दिल्ली, छत्तीसगड ह्या प्रत्येक राज्यांमध्ये शेकडो लोकांचे दर दिवशी बळी जात आहेत,.याच स्थितीत रविवारी देशातील पाच ठिकाणच्या विधानसभा निवडणुकींची मतमोजणी होणार आहे. 

मतदान संपल्यानंतर जे एक्झिट पोल समोर येत आहेत, त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार असेच चित्र आहे. तामीळनाडूत स्टॅलीन-काँग्रेस, केरळात पिनारायी विजयन पुन्हा तर आसामात भाजप सत्ता राखणार असेच चित्र आहे. एक्झिट पोल अनेक वेळा चुकीचे ठरतात, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होणार की तिथली जनता पुन्हा ममता बॅनर्जीच्या हातीच सत्ता देणार हे २ मे रोजी स्पष्ट होईल. आपल्या पक्षात आपल्या इतके सक्षम असे दुसऱ्या फळीतले नेते तयार न करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी डाव्यांनी जसे पश्चिम बंगालला मागास ठेवले, मतदारांच्या जिवावर वर्षानुवर्षे राज्य करून विकासच करण्याचे विसरून गेले, त्यापेक्षा आज पश्चिम बंगालची वेगळी स्थिती नाही. दिल्लीत अरविंद केजरीवाल, केरळात पिनारायी विजयन यांनी जसे काम चालवले आहे ते काम दुफळी माजवू पाहणाऱ्या शक्तींना राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून दूर ठेवण्यास मदत करते. पश्चिम बंगालमध्ये असा विकासाचा मार्गच दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्यांकांचा लाभ घेत ममता बॅनर्जी सत्ता भोगत आहे असा जो आरोप भाजपकडून होत आहे तो काही अंशी खरा आहे. तिथे विकास, शिक्षण, रोजगार ह्या गोष्टींना लोक अजूनही फारसे महत्त्व देत नाहीत. त्याचाच फायदा राजकीय पक्ष उठवत आहेत. भाजपने उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सत्ता स्थापन करून फार काही दिवे लावले नाहीत किंवा विकासाचा एकही नवा मॉडेल आणला नाही. या गोष्टींचाही प्रभाव पश्चिम बंगालमधील मतदारांवर पाडण्याचा प्रयत्न भाजप विरोधी पक्षांकडून झाला आहे. अन्यथा ज्या पद्धतीने भाजपा आक्रमक होऊन पश्चिम बंगालमध्ये लढत होती ते पाहता एक्झिट पोल खोटे ठरण्याची आवश्यकता होती.  फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर केरळमध्ये पिनाराई पुन्हा येऊ शकतात, आसाममध्ये भाजप सत्ता राखू शकते. तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलीन यांच्या डीएमकेला सत्ता मिळू शकते. पुदुच्चेरीमध्ये एनडीएला संधी मिळणार असेच संकेत सध्याच्या एक्झिट पोलमधून मिळतात..तामिळनाडूमध्ये सध्या सत्तेत असलेल्या एआयएडीएमके ने भाजपाशी युती केली होती. पण त्यांच्या युतीला जनता नाकारणार असे एक्झिट पोल सुचवते. 

डीएमकेने काँग्रेसशी युती केली होती त्यामुळे स्टॅलीन सत्तेत येणे म्हणजे काँग्रेसला थोडे बळ येणार आहे.  तिकडे आसाममध्ये ममता बॅनर्जी आणि केरळात पिनाराई पुन्हा आले तर सध्याची चार राज्ये आणि संघप्रदेशातील निवडणुकीतून भाजपला फारसे काही गवसणार नाही. उलट भाजपची घोर निराशाच होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर भाजपची नाचक्कीच होईल.  कोविडच्या महामारीत जनतेची सुरक्षा लक्षात घेऊन जर भाजपने निवडणूक आयोगाजवळ मागणी केली असती तर आज निवडणुका लांबणीवर पडल्या असत्या. कोविडही त्या राज्यांमध्ये नियंत्रणात असण्याची शक्यता होती. पण लोकांचा आणि महामारीचा विचार केंद्र सरकारने केलाच नाही. निवडणूक आयोगही त्याच मार्गाने गेले. या निवडणुकांचे एक्झिट पोल पाहिले तर भाजपच्या पदरात निराशाच पडण्याची शक्यता आहे.