महालसा संस्थान भाविकांसाठी बंद

सभागृहासाठी कार्यक्रमांची नवीन नोंदणी स्वीकारली जाणार नाही


23rd April 2021, 12:41 am

पणजी : राज्यात वाढत असलेल्या कोविड १९ रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थान शुक्रवार, दि. २३ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर व्यवस्थापन समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दैनंदिन पूजा, रविवार आणि पंचमीची पालखी पुजारी, सेवेकरी, समितीचे पदाधिकारी, मंदिरातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. मंदिराचे कँटीन बाहेरील लोकांसाठी बंद राहील. सभागृहासाठी कार्यक्रमांची नवीन नोंदणी स्वीकारली जाणार नाही. आधीच ठरलेले विवाह वा व्रतबंधनाचे कार्यक्रम शासनाची कोविड मार्गदर्शक तत्त्वे पाळून करता येतील. कोविडची साखळी तोडण्यासाठी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये व समितीला सहकार्य करावे. कोविडचा हा नवा स्ट्रेन वेगाने पसरणारा आहे. गर्दी करणे टाळा, नेहमी मास्क परिधान करा आणि सामाजिक अंतराचे पालन करा, असे आवाहनही मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.