Goan Varta News Ad

८९ टक्के कोविड बाधित घरी विलगीकरणात!

|
23rd April 2021, 12:38 Hrs
८९ टक्के कोविड बाधित घरी विलगीकरणात!

पणजी : कोविड इस्पितळांतील खाटा रुग्णांनी भरल्या असल्या तरी राज्यातील ८९ टक्के सक्रिय बाधित घरी विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत ९ हजार १०७ रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत. या महारोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांचे १ मे पासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. राज्यात १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांची संख्या ६ लाख ६० हजार इतकी आहे, अशी माहिती आरोग्य सचिव रवि धवन यांनी दिली.
येथे गुरुवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.
राज्यात ऑक्सिजन सिल‌िंडरचा तुटवडा नाही. सध्या प्लाझ्मा पेढीत ३० प्लाझा उपलब्ध आहेत. दिवसाकाठी ७ ते ८ प्लाझ्मांची गरज भासते. करोना नमुन्यांच्या चाचणीसाठी ‘थायरोकेअर’ या खासगी प्रयोगशाळेची मदत घेतली जात आहे. येथून ३६ तासांत ५ हजार चाचण्यांचे अहवाल मिळू शकतात, असे धवन यांनी सांगितले.
राज्यातील ९५६ बाधित इस्पितळांत उपचार घेत आहेत. तर, १६५ कोविड निगा केंद्रांत आहेत. सर्व इस्पितळांत मिळून १ हजार ६० खाटा असून त्यापैकी ९५६ खाटांवर रुग्ण आहेत. यातील गोमेकॉत ३१०, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ३२०, ईएसआयमध्ये १५०, फोंंडा इस्पितळात ६३ बाधित उपचार घेत आहेत. निगा केंद्रांमध्ये ४५५ खाटा आहेत. त्यांपैकी १६५ खाटा रिक्त आहेत, अशी माहिती धवन यांनी दिली.
लस ८० टक्के प्रभावी!
ताप आल्यास किंवा करोनाची अन्य लक्षणे जाणवल्यास लगेच इस्पितळात जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीस विलंब हेच बहुतेक बाधितांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे, असे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सर्वांनी लस घ्यावी. ही लस ८० टक्के सुरक्षित आहे. लसीकरणानंतरही करोना झाल्यास त्याचा फारसा परिणाम आरोग्यावर होत नाही, असेही बांदेकर यांनी म्हटले आहे.