Goan Varta News Ad

एप्रिल अखेरपर्यंत नाईट कर्फ्यू

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

|
21st April 2021, 11:57 Hrs
एप्रिल अखेरपर्यंत नाईट कर्फ्यू

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. (नारायण पिसुर्लेकर)
- रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत अंमलबजावणी
- गर्दी नियंत्रणासाठी जमावबंदी कडक
- बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या
- लॉकडाऊन नाहीच, सहकार्याचे आवाहन
.............................................................
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील करोना उद्रेकावर नियंत्रण आणण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ‘नाईट कर्फ्यू’ लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
राज्यात लॉकडाऊनची अजिबात अंमलबजावणी केली जाणार नाही. ‘नाईट कर्फ्यू’चा कालावधी वगळता सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. करोनाची दुसरी लाट राज्यात दाखल झाली आहे. त्यामुळे दिवसभरातील बाधितांच्या संख्येने दीड हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. करोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोमंतकीयांतील भीती वाढत चालली आहे. ही परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठीच सरकारने सर्वच आमदार, मंत्र्यांना विश्वासात घेऊन निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
करोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक स्थळांवर गर्दी करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे, गरज नसताना रस्त्यांवर फिरणे आदी प्रकार बंद होणे गरजेचे आहे. सार्वजनिक स्थळांवरील गर्दी रोखण्यासाठी गुरुवारपासून जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
.............................................
काय सुरू?
- कॅसिनो, बार आणि रेस्टॉरन्ट, रिव्हर क्रूझ, मसाज पार्लर, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, सार्वजनिक बससेवा ५० टक्के क्षमतेने
- सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बागायतदार, औद्योगिक वसाहतींतील कारखाने, कंपन्या, आस्थापने
- मर्यादित लोकांना जमवून पूजा, आरती व इतर धार्मिक उत्सव
- सर्वच शहरांतील आठवडी बाजार
- हॉलमधील लग्नसमारंभासाठी ५० जणांना परवानगी
- अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी
...............................................
काय बंद?
- स्विमिंग पूल, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था
- राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा संस्था
- मनोरंजनात्मक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा
- राजकीय सभा, बैठका
- चर्च, मशिदींतील दररोजच्या प्रार्थना
.......................................................
‘नाईट कर्फ्यू’ काळातही परवानगी
- राज्यातील आणि सीमांवरील माल व प्रवासी वाहतूक
- मेडिकल, पेट्रोल पंप तसेच इतर अत्यावश्यक सुविधा
- कॅसिनो, बार, हॉटेल्स अंतर्गत सुरू ठेवण्यास परवानगी, रात्री १० नंतर प्रवेश बंद.
.................................................
बोर्ड परीक्षांचा निर्णय ३० एप्रिलनंतर
करोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि गोवा शालान्त मंडळाने बारावीची २४ एप्रिलपासून सुरू होणारी बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा जास्त काळ पुढे ढकलली जाणार नाही. ३० एप्रिलनंतर राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन गोवा बोर्ड दहावी, बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.
................................................................
‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा
सरकारी कार्यालये, खासगी आस्थापनांना सरकारने ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा दिली आहे. सरकारी कार्यालयांना ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा पर्याय देण्यात आला असून, त्यासंदर्भातील अधिकार खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. खासगी आस्थापनांनीही मर्यादित कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
.........................................................................
लेखी परीक्षा पुढे ढकलल्या
सरकारी पदांसाठीच्या लेखी परीक्षा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. आरोग्य खात्यातील आवश्यक पदे मुलाखती घेऊन भरली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गर्दी टाळण्यासाठी सरकारी पद भरतीसाठीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार नाहीत. करोना प्रसार नियंत्रणात आल्यानंतर त्या होतील, असेही त्यांनी नमूद केले.
..........................................................................
किनारी भागांत सर्वाधिक ‘हॉटस्पॉट’
- गोमेकॉतील साथीचे रोग विभागातील तज्ज्ञांनी सरकारला सादर केलेल्या अहवालात किनारी भागांत करोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट असल्याचे नमूद केले आहे. असे हॉटस्पॉट शोधून काढून त्यांना काही दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
- ज्या परिसरात करोनाबाधितांची संख्या वाढेल, त्या परिसराला लघु प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येईल. तेथील दुकाने तसेच अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
..................................................
रुग्णांची माहिती देण्यासाठी ‘पीआरओ’
खासगी तसेच सरकारी इस्पितळांत करोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांची (पीआरओ) नेमणूक करण्यात येईल. त्यांचे मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या मणिपाल, हेल्थवे, अपोलो व्हिक्टर या खासगी इस्पितळांना दर कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
....................................................
मुख्यमंत्र्यांची जागृती अन् आवाहन
- राज्यातील कोविड इस्पितळांत अतिरिक्त खाटांची तरतूद.
- १० मेपर्यंत गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी इस्पितळ कार्यान्वित, तेथे करोनाबाधितांवर होणार उपचार.
- राज्यात रेमेडिस्वीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनचा मुबलक साठा.
- केंद्र सरकारकडून विकत घेणार मेडिकल ऑक्सिजन
- करोनाबाधितांवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांचे राहणार नियंत्रण.
- घरी अलगीकरणात असलेले बहुतांशीजण नियमावली पाळत नाहीत. त्यामुळे कुटुंबे बाधित होण्याच्या प्रमाणात वाढ.
- करोनाबाधितांनी तत्काळ कोविड केअर सेंटर्समध्ये दाखल व्हावे, कीट मिळवून उपचार सुरू करावे.
- करोनाबाबत जागृती करा, अफवा पसरवू नका.