काँग्रेस पक्षाचा बनावट शिक्का वापरून बोगस ठराव

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची दहा आमदारांविरोधात पोलिसांत तक्रार


21st April 2021, 11:55 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजपात प्रवेश केलेल्या दहा आमदारांनी काँग्रेस पक्षाचा बनावट शिक्का वापरून पक्ष भाजपात विलीन झाल्याचा बोगस ठराव केला, अशी तक्रार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पणजी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. फसवणूक, बनावट कागदपत्रे, बनावट शिक्का, चुकीचा पुरावा सादर केल्याबद्दल दहा आमदारांविरोधात ४६३, ४६५, ४६८, ४७१, ४७३, ४७६, ४२०, १९२, १९३, १९९, २००, २०९, १२० बी या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चंद्रकांत कवळेकर, बाबूश मॉन्सेरात, जेनिफर मॉन्सेरात, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, इजिदोर फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, क्लाफासियो डायस, विल्फ्रेड डिसा, टोनी फर्नांडिस आणि नीळकंठ हळर्णकर या आमदारांनी बनावट शिक्क्याच्या आधारे बोगस ठराव केला. या ठरावाचा वापर त्यांनी अपात्रता याचिकेच्या सुनावणीवेळी पुरावा म्हणून केला, असे तक्रारीत म्हटले आहे. वरील आमदारांनी २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. या आमदारांविरोधात चोडणकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली होती. ती सभापती राजेश पाटणेकर यांनी मंगळवारी फेटाळून लावली. त्यानंतर बुधवारी चोडणकर यांनी ही तक्रार दाखल केली.
१० जुलै २०१९ रोजी प्रदेश काँग्रेसची बैठक होऊन पक्ष भाजपात विलीन करण्याचा ठराव संमत झाल्याची कागदपत्रे सुनावणीवेळी सभापतींसमोर सादर करण्यात आली. परंतु १० जुलै २०१९ रोजी प्रदेश काँग्रेस समितीची बैठकच झालेली नाही. २९ मे २०१९ नंतर २४ जुलै २०१९ रोजी बैठक झाल्याची नोंद आहे. दहा आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

हेही वाचा