थरारक लढतीत बंगळुरूचा विजय

सनरायझर्स हैदराबादचा ६ धावांनी पराभव : मॅक्सवेलचे अर्धशतक


15th April 2021, 12:12 am

चेन्नई : शाहबाज अहमदच्या एकाच षटकात सनरायझर्स हैदराबादच्या दिशेने असलेला सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या दिशेने झुकला. पहिल्या मॅचचा हिरो असलेल्या हर्षल पटेलने शेवटच्या ओव्हरमध्ये दबावात चांगली बॉलिंग केली. त्यामुळे बंगळुरुने थरारक लढतीत हैदराबादचा ६ धावांनी पराभव केला. आरसीबीचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे.
सनरायझर्स हैदराबादची १५० धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली नाही. वृद्धीमान साहा फक्त १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे या जोडीनं हैदराबादची इनिंग सावरली. या अनुभवी जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी केली. डेव्हिड वॉर्नरने यावेळी त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर लगेच तो ५४ धावांवर बाद झाला.
अहमदने फिरवला सामना
वॉर्नर बाद झाल्यानंतरही मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने हैदाराबादचा पाठलाग पुढे सुरू ठेवला. हैदराबाद आरामात सामना जिंकेल असे वाटत असतानाच १७ व्या षटकामध्ये सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली. आरसीबीचा नवोदित बॉलर शाहबाज अहमदने त्या षटकात ३ गडी बाद करत सामन्यामध्ये रंगत आणली. त्याने एकाच षटकात बेअरस्टो, पांडे आणि अब्दुल समद या तिघांना बाद केले.
अहमदच्या षटकानंतर आरसीबीने सामन्यामध्ये पुनरागमन केले. विजय शंकर आणि जेसन होल्डर या अनुभवी जोडीवर हैदराबादची मदार होती. या संकटाच्या प्रसंगात शंकर पुन्हा एकदा फेल झाला. तो हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन बाद झाला.
विजय शंकर बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात जेसन होल्डर बाद झाला. राशिद खानने फटकेबाजी करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. बंगळुरूकडून शाहबाज अहमदने सर्वात जास्त ३ गडी बाद केले. तर हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन गडी बद करत त्याला चांगली साथ दिली.
तत्पुर्वी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १४९ धावांवर रोखले. ग्लेन मॅक्सवेलच्या झुंझार अर्धशतकाच्या बळावर बंगळुरूने २० षटकात ८ बाद १४९ धावा केल्या होत्या. गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादने बंगळुरूला दीडशेच्या आत रोखले.
सुरुवातीला विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामीला आले. करोनावर मात करून प्रथमच मैदानावर उतरलेल्या पडीक्कलवर सर्वांचे लक्ष होते. त्याने दोन चौकार मारून सर्वांच्या अपेक्षा उंचवल्या. परंतु, भुवनेश्वर कुमारने त्याला मोठी खेळी करू दिली नाही. तिसऱ्याच षटकात भुवनेश्वरने पडीक्कलला ११ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला शाहबाझ अहमदही १४ धावांवर बाद झाला.
त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूला सावरले. मात्र, शाहबाज नदीमच्या फिरकीवर फटके मारताना मॅक्सवेल चाचपडताना दिसला. त्याने टाकलेल्या ९ चेंडूंत मॅक्सवेलला २ धावाच घेता आल्या. आरसीबीला पहिल्या दहा षटकांत २ बाद ६३ धावा करता आल्या. ११व्या षटकात मॅक्सवेलने गिअर बदलला अन् नदीमने टाकलेल्या पहिल्या चार चेंडूंत १७ (२ षटकार व १ चौकार) धावा कुटल्या. नदीमने ४ षटकांत ३६ धावांत १ गडी बाद केला. त्याच्या चौथ्या षटकात २२ धावा आल्या. बंगळुरूची गाडी आता सुसाट धावेल असे वाटत असताना १३व्या षटकात जेसन होल्डरने पहिल्याच षटकात विराटला ३३ धावांवर बाद केले. विराट-ग्लेनने ३८ धावांत ४४ धावांची भागीदारी केली.
विराट बाद झाल्यानंतर मागील सामन्याचा शिल्पकार एबी डिव्हिलियर्स केवळ एका धावेवर बाद झाला. यानंतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदर (८) आणि डॅनियल ख्रिश्चन (१) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. एकीकडे विकेट पडत असताना ग्लेन मॅक्सवेलने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. आरसीबीला २० षटकांत ८ बाद १४९ धावा करता आल्या. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर राशिद खानने २ विकेट घेतल्या.
‍धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ८ बाद १४९ धावा. विराट कोहली झे. विजय शंकर गो. जेसन होल्डर ३३, देवदत्त पडिक्कल झे. शाहबाज़ नदीम गो. भुवनेश्वर कुमार ११, शाहबाज अहमद झे. रशीद खान गो. शाहबाज नदीम १४, ग्लेन मॅक्सवेल झे. ऋद्धिमान साहा गो. जेसन होल्डर ५९, एबी डिविलियर्स झे. डेविड वॉर्नर गो. रशीद खान १, वॉशिंग्टन सुंदर झे. मनीष पांडे गो. रशीद खान ८, डेनियल क्रिश्चियन झे. ऋद्धिमान साहा गो. थंगरसू नटराजन १, काईल जेमीसन झे. मनीष पांडे गो. जेसन होल्डर १२, हर्षल पटेल (नाबाद) ०. अवांतर १०. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-३०-१, जेसन होल्डर ४-०-३०-३, शाहबाज नदीम ४-०-३६-१, थंगरसू नटराजन ४-०-३२-१, रशीद खान ४-०-१८-२
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ९ बाद १४३ धावा. ऋद्धिमान साहा झे. ग्लेन मॅक्सवेल गो. मोहम्मद सिराज १, डेविड वॉर्नर झे. डेनियल क्रिश्चियन गो. काईल जेमीसन ५४, मनीष पांडे झे. हर्षल पटेल गो. शाहबाज अहमद ३८, जॉनी बेयरस्टो झे. एबी डिविलियर्स गो. शाहबाज अहमद १२, अब्दुल समद झे. व गो. शाहबाज अहमद ०, विजय शंकर झे. विराट कोहली गो. हर्षल पटेल ३, जेसन होल्डर झे. डेनियल क्रिश्चियन गो. मोहम्मद सिराज ४, रशीद खान धावचित (मोहम्मद सिराज/एबी डिविलियर्स) १८, भुवनेश्वर कुमार ‍नाबाद २, शाहबाज़ नदीम झे. शाहबाज अहमद गो. हर्षल पटेल ०, थंगरसू नटराजन नाबाद ०. अवांतर १२. गोलंदाजी : मोहम्मद सिराज ४-१-२५-२, काईल जेमीसन ३-०-३०-१, वॉशिंग्टन सुंदर २-०-१४-०, युजवेंद्र चहल ४-०-२९-०, हर्षल पटेल ४-०-२५-२, डेनियल क्रिश्चियन १-०-७-०, शाहबाज अहमद २-०-७-३.