व्हॅली डिकॉस्टा, अमीर गवंडी यांची फातोर्डा पोलिसांपुढे शरणागती

गुंड अन्वर शेख खुनी हल्ला प्रकरण : दोघांनाही अटक


09th April 2021, 12:20 am
व्हॅली डिकॉस्टा, अमीर गवंडी यांची फातोर्डा पोलिसांपुढे शरणागती

फोटो : संशयित व्हॅली डिकॉस्टा व अमीर गवंडी यांना कोठडीत नेताना फातोर्डा पोलीस. (संतोष मिरजकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : फातोर्डा परिसरात गुंड अन्वर शेख याच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी याआधी सातजणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी व्हॅली डिकॉस्टा व अमीर गवंडी यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. संशयित व्हॅली व अमीर यांनी गुरुवारी फातोर्डा पोलिसांसमारे शरणागती पत्करली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे.
फातोर्डा आर्लेम परिसरात १६ फेब्रुवारी रोजी गुंड अन्वर शेख याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. शेख याच्यावर तलवार, चेन, लोखंडी दांडा, कोयता यासह हल्ला करतानाच बंदुकीने गोळी झाडण्यात आली होती. या प्रकरणात गोळी लागल्याने शेख याच्या पायाला दुखापत झाली होती. या खुनी हल्ल्यानंतर रिकी होर्णेकर याला फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विपुल पट्टारी या संशयितालाही फातोर्डा परिसरातून ताब्यात घेत अटक केली होती. काही दिवसांच्या शोधानंतर २२ फेब्रुवारी रोजी इम्रान बेपारी, हर्षवर्धन सावळ, विजय कारबोटकर, सुधन डिकॉस्टा, महिंदर उर्फ मयूर तानावडे या पाच संशयितांना कोल्हापूर येथून गोव्यात आणण्यात फातोर्डा पोलिसांना यश आले होते. पाच संशयितांना अटक केल्यानंतरही संशयित व्हॅली डिकॉस्टा व अमीर गवंडी हे सापडत नव्हते. पोलिसांनी या दोघांसाठी लुक आउट नोटीस जारी केली होती. संशयित व्हॅली याने अन्वर याच्यावर गोळी चालवली होती, त्यामुळे या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी संशयितांपैकी मयूर तानावडे याला जामीन मिळाला आहे. विजय कारबोटकर व सुधन डिकॉस्टा यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. व्हॅली व अमीर यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, या प्रयत्नांना यश न आल्याने त्यांनी फातोर्डा पोलिसांत हजेरी लावली. वकिलांसह फातोर्डा पोलिस ठाण्यात येत शरणागती पत्करलेल्या संशयित व्हॅली व अमीर या दोघांनाही रितसर अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.