पालिका निवडणुकीसाठी किती जणांनी भरले अर्ज? कुठच्या पालिकेसाठी सर्वाधिक अर्ज?

जाणून घ्या सविस्तर बातमी एका क्लिकवर...


08th April 2021, 07:11 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे नगरपालिकांसाठीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर ३१ मार्च ते ८ एप्रिल अशी उमेदवारी अर्जांसाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत पाचही पालिकांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ५३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी अर्जांची छाननी होणार आहे. १० एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल, त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल.

पाच पालिकांच्या निवडणुका रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निवाडा योग्य ठरवत निवडणूक प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्चला संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या पाच पालिकांसाठी २३ एप्रिलला मतदान होणार असून, २६ एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार आहे.

उत्तर गोव्यातील म्हापसा पालिकेसाठी एकूण १२२ अर्ज आले आहेत, तर दक्षिण गोव्यातील चार पालिकांसाठी ४१० उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. या पाचही पालिकांच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी १०, दुसऱ्या दिवशी २६, तिसऱ्या दिवशी २२, चौथ्या दिवशी १२९, पाचव्या दिवशी १३७, सहाव्या दिवशी ११३ आणि सातव्या व अखेरच्या दिवशी ९५ अर्ज दाखल झाले. मुरगाव पालिकेसाठी सर्वाधिक १५७, तर सांगे पालिकेसाठी सर्वात कमी म्हणजे ४६ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत. 


नगरपालिकानिहाय उमेदवारी अर्जांवर एक नजर...

नगरपालिका - उमेदवारी अर्ज

१. म्हापसा - १२२

२. मडगाव - १३१

३. मुरगाव - १५७

४. केपे - ७६

५. सांगे - ४६


पंचायत पोटनिवडणुकीसाठी किती अर्ज?

या पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसोबतच दोन पंचायतींची पोटनिवडणूक होत अाहे. त्यात कारापूर-सर्वण पंचायतीचा प्रभाग २ आणि वेळ्ळी पंचायतीच्या प्रभाग ४ चा समावेश आहे. या दोन्ही पंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी पहिल्या चार दिवसांत एकही अर्ज आला नव्हता. त्यानंतर अखेरच्या तीन दिवसांत कारापूर-सर्वणसाठी ६, तर वेळ्ळीसाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत.