मगोपच्या अध्यक्षपदी दीपकच!

पक्षाअंतर्गत निवडणुकीत संपूर्ण पॅनलचा विजय

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th January 2021, 12:35 am
मगोपच्या अध्यक्षपदी दीपकच!

पणजी : मगो पक्षाचे अध्यक्षपद आणि केंद्रीय समितीच्या सदस्यपदांसाठी झालेल्या निवडणुकीत दीपक ढवळीकर आणि त्यांचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधक नीलेश पटेकर यांच्यावर ४०९ मतांनी दीपक यांनी मात केली. नीलेश यांना केवळ ३३ मते पडली.
मगोपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी मतपत्रिकेच्या आधारे मतदान घेतले. १९९८ नंतर शनिवारी पहिल्यांदाच मगोपची निवडणूक मतपत्रिकेच्या आधारे झाली. यात ९०० पैकी केवळ ४५३ मतदारांनी भाग घेतला. पक्षाच्या केंद्रीय समितीसाठी झालेल्या निवडणुकीत दीपक यांच्या पॅनलला पूर्ण बहुमत प्राप्त झाले. याशिवाय अन्य पदांसाठी सदस्य म्हणून १४ जणांचा विजय झाला. दोन पदांसाठीचे सदस्य बिनविरोध निवडून आले.
आगामी निवडणूक प्रियोळमधून लढणार!
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दीपक ढवळीकर यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार मगोपने निवडणूक घेतली. यातून अनेकांना चपराक बसली आहे. मगोप हा केवळ ढवळीकर बंधूंचा पक्ष आहे, असे म्हणणाऱ्यांना या निवडणुकीतून उत्तर मिळाले आहे, असे दीपक यांनी म्हटले आहे. तसेच २०२२ ची विधानसभा निवडणूक मी प्रियोळमधून लढणार आहे. सध्या पक्षाच्या विस्तारावर भर दिला जाईल, असेही दीपक यांनी म्हटले आहे.
मगोची नवीन कार्यकारिणी
दीपक ढवळीकर (अध्यक्ष), प्रताप फडते (कार्याध्यक्ष), कृष्णन्त दिवकर (उपाध्यक्ष), रत्नाकांत म्हार्दोळकर (सचिव, बिनविरोध), अनंत नाईक (खजिनदार, बिनविरोध); कार्यकारिणीचे सदस्य : नरेश गावडे, राघोबा गावडे, शिवदास गावडे, सुदीप कोरगावकर, फ्रान्सिस लोबो, अनिल नाईक, राजू नाईक, महेश पणशीकर, महेश साटेलकर, संदीप वेर्णेकर, श्रीपाद येंडे.

हेही वाचा