Goan Varta News Ad

नाटकी विरोध नको; मंत्रिपदाचा राजीनामा द्या!

|
14th January 2021, 12:14 Hrs
नाटकी विरोध नको; मंत्रिपदाचा राजीनामा द्या!

वाळपई : मेळावलीतील आंदोलनाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणेच पूर्णपणे जबाबदार आहेत. येथील जनता आयआयटीला प्राणपणाने विरोध करत असताना विश्वजीत यांनी आंदोलन चिरडण्याचा हरएक प्रयत्न केला. मात्र, आंदोलनाची धग तालुक्यातच नव्हे तर, राज्यात पसरू लागताच विश्वजीत यांनी रंग बदलून आंदोलनाला पाठिंबा देत, आयआयटी प्रकल्प रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यांना सत्तरीतील जनतेची एवढीच काळजी असेल तर, नाटकी विरोध न करता त्यांनी मंत्रिपद व भाजपच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी वाळपई काँग्रेस गट समितीने केली आहे.
येथील काँग्रेस कार्यालयात बुधवारी झालेल्या समितीच्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष दशरथ मांजरेकर, महिला मोर्चाच्या स्थानिक अध्यक्ष रोशन देसाई, सरचिटणीस नंदकुमार कोपार्डेकर, कृष्णा नेने, महंमद खान, शेख हर्षद, सुरेश कोदाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विश्वजीत यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी वाळपईतील अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अंगणवाडी सेविका लता गावकर यांची काणकोणमध्ये बदली केली. विश्‍वजित यांना खरोखरच मेळावली प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी आंदोलकांविरोधात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा. गावकर यांची केलेली बदली रद्द करावी आणि सरकार ऐकत नसेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमधून बाहेर पडावे. आंदोलनाला पाठ‌िंबा देण्याचे नाटक करू नये. अन्यथा सत्तरी तालुक्यातील जनता ते कधीही सहन करणार नाही, असा इशाराही समितीने दिला आहे.
टॅक्सी संघटनांचा पाठिंबा
- मेळावलीतील आंदोलकांना आतापर्यंत सत्तरी तालुक्यातील जवळपास चौदा गावांनी पाठिंबा दर्शविला आहे. या आंदोलनाला बुधवारी काळ्या-पिवळ्या टॅक्सी व पर्यटक टॅक्सी संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन या संघटनांनी दिले आहे.
- शेळ मेळावलीत जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर शुक्रवारपासून नाकाबंदी करण्यात आली होती. त्यासाठी रस्त्यांवर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बुधवारी हा फौजफाटा माघारी बोलविण्यात आला. मात्र, आंदोलकांनी जल्मी देवस्थानाच्या प्रांगणात बुधवारीही नेहमीप्रमाणे आंदोलन केले.
काँग्रेसची मंत्री गावडेंवर टीका
मडगाव : शेळ-मेळावली येथे आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करून भूमिपुत्रांचा अपमान केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही चोडणकर यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी आदिवासी कुटुंबांच्याही जमिनी जाणार असल्याने गोंयच्या कूळ मुंडकारांचो आवाज आणि गाकुवेध या संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याची जाणीव मंत्री गावडे यांनी ठेवायला हवी, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.