Goan Varta News Ad

मिलिंदची वादग्रस्त ‘सेटींग’

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
14th November 2020, 11:50 Hrs
मिलिंदची वादग्रस्त ‘सेटींग’

परशुरामाची भूमी असलेल्या गोव्यावर निसर्गाची असीम कृपा राहिलेली आहे. त्यामुळे इथल्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र, का कुणास ठाऊक निसर्गासोबतच संस्कृती व सभ्यतेचा विशाल खजिना बाळगून असलेल्या गोव्याबाबत एक वेगळीच प्रतिमा देशी - विदेशी पर्यटकांच्या मनात निर्माण झाली आहे. गोव्याला एक ‘पाश्चिमात्य’ किनार लाभली असल्याचा गोड गैरसमज घेऊन इथे अनेक पर्यटक येतात. दुर्दैव म्हणजे कित्येक ‘स्वदेशी’ पर्यटक ही लाज-लज्जा वेशीला टांगूनच गोव्यात प्रवेश करतात. त्यातही मनोरंजन क्षेत्राशी निगडीत कलाकारांविषयी तर बोलायलाच नको. गोव्याचे समुद्रकिनारे म्हणजे त्यांच्यासाठी मोकळे रान. मदनिका, मदिरा... झालेच तर अमली पदार्थ व अश्लीलतेचा कळस गाठतील अशी छायाचित्रे...

पूनम पांडे व मिलिंद सोमण हे त्याच पठडीत बसणारे कलाकार असून, सध्या त्यांचे प्रताप सोशल मीडियावर गाजत आहेत. मुळात या सेलिब्रिटीच गोव्याची प्रतिमा डागाळण्यास कारणीभूत ठरतात, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरता कामा नये. गोव्यात समुद्रकिनार्‍यावर अश्लील व्हिडीओ चित्रित केल्याप्रकरणी अभिनेत्री - मॉडेल पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बेला अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच समुद्रकिनाऱ्यावर ‘न्यूड’ फोटोशूट केल्याप्रकरणी मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्ताने मिलिंदने समुद्र किनारी नग्नावस्थेत धावतानाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. खरे तर पूनम काय किंवा मिलिंद काय... कुप्रसिद्धीतून प्रसिद्धी प्राप्त झालेली ही दोन्ही मंडळी. त्यांची चित्रपट कारकिर्द यथातथाच आहे, मात्र त्यांची ‘नौटंकी’च अधिक गाजत राहिलेली आहे. हे दोन्ही कलाकार त्यांच्या कामापेक्षा ‘प्रतापां’मुळेच चर्चेत असतात. अंगावरचे कपडे उतरवून अचानक प्रसिद्धीच्या झोतात येणे हा दोघांचाही ‘छंद’ असावा. कारण एका जाहिरातीत मधु सप्रे या मॉडेलसोबत नग्नावस्थेतील छायाचित्रांमुळे मिलिंद पूर्वीही चर्चेत आलेला आहे. पूनमविषयी तर जितके कमी बोलावे तितकेच उत्तम....

एक मात्र नक्की, अशा ‘उचापती’ करणाऱ्या कलाकारांसाठी सोशल मीडिया हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. एरव्ही यांना कुणी विचारत नसले, तरी असे काही तरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात मिलिंद व पूनमसारख्या कलाकारांची जमात अगदी पारंगत झाली आहे. ‘जगातले, सगळ्यातले सगळे मलाच कळते’ हा यांचा गोड गैरसमज, त्यामुळे कधी तरी एखाद्या अतिशय संवेदनशील विषयावर मुक्ताफळे उधळणे किंवा मग विवस्त्र होऊन सर्वांना आपल्या अस्तित्वाच्या खुणा दाखवणे हेच यांचे काम... मिलिंद सोमण तर सोशल मिडीयावर नानाविध पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या ‘असण्याची’ पोचपावतीच देत असतो. मग तो त्याचा ‘फिटनेस फंडा’ असो, शंभरीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या त्याच्या आईचा ‘योगा’ असो की, त्याच्यापेक्षा निम्म्या वयाची त्याची बायको असो.... याबाबत काहीना काही पोस्ट करत तो आपल्या तथाकथित चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

नुकताच आपल्या वाढदिनी त्याने इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला. ज्यात तो गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावर धावत असल्याचे दिसत आहे. आता त्याचे धावणे आक्षेपार्ह नसून, तो पूर्ण नग्नावस्थेत धावत असल्याने विषयाला तोंड फुटले आहे. काहींनी त्याचा तो अश्लील ‘लूक’ पसंत केला आहे, तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला आहे. हे छायाचित्र जगजाहीर करण्यामागचा मिलिंदचा हेतू मात्र फार काळ लपून राहिला नाही. नुकतेच त्याने आपले एक नवे छायाचित्र पोस्ट केले आहे. या छायाचित्रात तो ‘किन्नर’ रुपात आहे. बहुतेक त्याच्या आगामी चित्रपटात त्याची भूमिका ही ‘ट्रान्सजेंडर’ ची आहे. त्यामुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’शी आपल्या भूमिकेची तुलना होता कामा नये, म्हणून हा खटाटोप त्याने केला असावा. त्याने आदी आपल्या नावाची ‘हवा’ निर्माण केली असून, त्यानंतर हळूच आपल्या आगामी भूमिकेचे ‘पिल्लू’ सोडले असावे. आपल्या चित्रपटांची जाहिरात करण्यासाठी कलाकार जे नव-नवीन हातखंडे आजमावू लागले आहेत, त्यापैकीच हा एक असावा. कारण त्याचे नग्न छायाचित्र प्रदर्शित होताच त्याला ‘माऊथ पब्लिसिटी’ मिळाली व आता आपला दुसरा फोटो कसा व कसला असेल याबाबत लोकांना उत्सुकता असेलच याची पूर्ण खात्री तो बाळगून होता. त्यामुळे त्याने त्वरित आपला दुसरा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

त्याची ही खेळी पूर्णत: यशस्वी ठरली असून, त्याच्या दुसर्‍या छायाचित्रालाही तितकीच प्रसिद्धी लाभली आहे. खास करुन त्याचा नवा लूक प्रेक्षकांना इतका भावला आहे की, त्याच्या आगामी भूमिकेबाबत सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागली आहे. या सगळ्यात मिलिंदची ‘सेटींग’ जरी वाखाणण्यासारखी असली तरी, त्याने त्यासाठी केलेला सार्वजनिक स्थळाचा वापर हा चुकीचाच आहे आणि त्यासाठी तो नक्कीच शिक्षेस पात्र आहे. कारण आत्ताच ‘मांजर मारली’ नाही तर आगामी काळात गोव्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांवर या सेलिब्रिटींचा हा ‘नंगा नाच’ सुरुच राहील.

(लेखिका नामवंत सिनेसमीक्षक आहेत.)