Goan Varta News Ad

कुशल मनुष्यबळ वापरून ‘सागरमाला’चा लाभ घ्या

मुख्यमंत्र्यांचे आवाहन : कोकण मरीन क्लस्टरची पायाभरणी

|
25th October 2020, 11:46 Hrs
कुशल मनुष्यबळ वापरून ‘सागरमाला’चा लाभ घ्या

फोटो : कोकण मरीन क्लस्टर प्रकल्पाचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार ग्लेन टिकलो, आमदार विल्फ्रेड डिसा व मान्यवर. (अक्षंदा राणे)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : गोव्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्योजकांनी ’ब्लू इकोनॉमी व सागरमाला’ प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करताना  उद्योजक नक्कीच पुढे येतील, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी व्यक्त केली. वेर्णा येथे होऊ घातलेल्या कोकण मरीन क्लस्टर प्रकल्पाची दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला उद्योगमंत्री विश्वजीत राणे, डिजी शिपिंगचे के.पी. जयकुमार, क्लस्टरचे अध्यक्ष सूरज देयालानी व्यासपीठावर होते. गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो, नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा उपस्थित होते. आभासी पद्धतीने केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जहाजोद्योग मंत्री मनसुख मंडलिया यांच्या हस्ते पायाभरणी फलकाचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘कोकण मरीन क्लस्टर’ प्रकल्पामुळे जहाज बांधणी, दुरुस्ती व इतर सुविधा तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळण्यास हातभार लागेल. रोजगार निर्मितीसाठी अशाप्रकारचे प्रकल्प उभारण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे. त्यांना सर्वते सहकार्य दिले जाईल. उद्योगमंत्री विश्वजीत राणे यांनीही कोकण मरीन क्लस्टरचा लाभ घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनसुख मंडलिया यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. गडकरी यांच्या योगदानामुळे गोव्यामध्ये रस्ते व पुलाची कामे तडीस गेली आहेत.

डिजी शिपिंगचे अमिताभकुमार म्हणाले की, गोवा जहाजोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तथापि येथील उद्योगाला काही मर्यादा आहेत. या उद्योगाला पाठबळ मिळावे यासाठी आम्ही क्लस्टरसाठी पुढाकार घेतला होता. जहाजबांधणी, दुरुस्ती व इतर गोष्टींना क्लस्टरमुळे मोठा लाभ होणार आहे. या क्लस्टरमुळे प्रदूषण, खर्च व वेळ कमी होईल. दर्जा व तंत्रज्ञान वाढणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी क्लस्टरला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. क्लस्टरमुळे खर्चाचे प्रमाण कमी होईल. जहाजोद्योगाला चालना मिळेल. जलवाहतुकीचा विकास गरजेचा आहे. स्वदेशी मालाची मागणी वाढण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. किनारी वाहतूक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- मनसुख मंडलिया, जहाजोद्योग मंत्री 

आंदोलनांमुळे बंदरांचा विकास खोळंबला

गोव्यातील दोन बंदराद्वारे आम्ही खूप काही करू शकतो. त्यासाठी आंदोलने सोडून द्या. कोळसा गोव्यात आम्ही आणला नाही किंवा त्याची मात्राही वाढवली नाही. गोव्यामध्ये फार्मा उद्योगधंदे आहेत. त्यांना त्यांचे उत्पादन मुंबईतील बंदरातून निर्यात करावे लागते. त्या सुविधा देण्याची गोव्यातील बंदरात क्षमता आहे. विरोधामुळे या गोष्टी पुढे जाऊ शकत नाहीत. खासगी हिस्सेदारीमध्ये येथील जलवाहतुकीचा विकास होऊ शकतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

नवीन गोष्टी, तंत्रज्ञान आत्मसात करा : नितीन गडकरी

आभासी पद्धतीने संबोधित करताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नवनवे तंत्रज्ञान वापरून जहाजोद्योगाचा विकास करण्याची गरज आहे. आत्मनिर्भरच्या अंतर्गत नवा भारत जगासमोर आणला पाहिजे. क्लस्टरमुळे विकासकामांना हातभार लागेल. गोव्याकडे मोठी क्षमता आहे. त्याचा योग्य वापर करण्यासाठी नवीन गोष्टी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा.