‘टाटा’ प्रतिमेला तडा जाणारे ‘सायरस-रतन’ द्वंद्व

या दोन दिग्गज नेतृत्वांमधील वादविवादाचा परिणाम आता टाटा सन्सबरोबरच विविध टाटा कंपन्यांच्या व्यवस्थापनांवर हळूहळू व्हायला लागलेला आहे. अनेक कंपन्यांचे बाजारपेठेतील भांडवली मूल्य कमी झालेले आहे. काही कंपन्या तोट्यात आहेत. भागधारकांच्या मनात चलबिचल सुरू झालेली आहे.

Story: प्रा. नंदकुमार काकिर्डे |
05th October 2020, 12:44 am
‘टाटा’ प्रतिमेला तडा जाणारे ‘सायरस-रतन’ द्वंद्व

भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये अत्यंत मोलाचा व अभिमानास्पद वाटा असलेला टाटा उद्योगसमूह सध्या अंतर्गत वादविवाद, कलहाने ग्रासलेला आहे. या उद्योगसमूहातील अनेक कंपन्यांची खरी मालकी असणार्‍या टाटा सन्स या होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळात किंवा त्याची मालकी असणार्‍या दोन गटांमध्ये न्यायालयीन युद्ध सुरू आहे. खरे तर टाटांच्या परंपरेला न शोभणार्‍या, त्यांच्या प्रतिमेला तडा जाणार्‍या या घटना आहेत. आजही देशातील सर्वसामान्यांच्या मनात टाटा समूहाबद्दल आदर, श्रद्धा व प्रेम आहे. मात्र रतन टाटा-सायरस मिस्त्री यांच्यातील वादंगाचे पडसाद केवळ देशाच्या औद्योगिक किंवा कंपनी व्यवस्थापन क्षेत्रात उमटलेले नाहीत तर जागतिक पातळीवर त्याचे तरंग उठत आहेत.

टाटा उद्योगसमूहाला त्यांची १५२ वर्षांची अत्यंत दैदिप्यमान परंपरा, आधुनिकीकरण व व्यावसायिक, धंदेवाईक समूह असूनही त्याला सह्रयता, मानवी चेहर्‍याची वैशिष्ट्यपूर्ण जोड लाभलेली आहे. गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला वेगळा धडा शिकवणार्‍या करोना महामारीच्या कालखंडात सर्वत्र आर्थिक अडचणी, संकटे निर्माण होत असूनही त्यास खंबीरपणे तोंड देत एकाही कर्मचार्‍याला कामावरुन कमी न करणार्‍या व उलटपक्षी देशातील विविध भागांमध्ये करोनाशी मरणयुद्ध करणार्‍या जनतेला व रुग्णालयांना सढळ हाताने मदत करणारा उद्योगसमूह हा आपल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये उच्च स्थान मिळवलेला उद्योगसमूह आहे. सामाजिक माध्यमांमध्ये दररोज रतन टाटांबद्दल अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. त्या वाचूनही सर्वसामान्य व्यक्तिंमध्ये टाटांबद्दलचा आदर वृद्धिंगत होताना दिसतो. अगदी करोनाची अवघ्या एका तासात निदान करणारी चाचणी तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी ही टाटा समूहातीलच असल्याने त्यांच्याबद्दलचे प्रेम सतत वाढताना दिसत आहे.

या टाटा समूहाची संपूर्ण मालकी असलेल्या टाटा सन्स या प्रमुख होल्डिंग कंपनीमध्ये मात्र सध्या उच्च व्यवस्थापनाच्या पातळीवर भरपूर वादावादी, न्यायालयीन लढाई सुरु आहे. वास्तविकत: टाटा सन्स व त्यांच्या विविध लोकोपयोगी न्यासातर्फे (पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) देशात फार मोठे लोककल्याणकारी काम अगदी १८६८ पासून म्हणजे स्थापनेपासून केले जाते. जमशेदजी टाटा हे या समूहाचे संस्थापक. त्यांचे १९०४ मध्ये निधन झाले. त्यांचा वारसा टाटा सन्स ही कंपनी आजतागायत अखंडपणे, कोणताही गाजावाजा न करता पुढे चालवत आहे. टाटा उद्योगसमूहात आजमितीला टाटा मोटर्स, टाटा स्टील, इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टायटन, ट्रेंट, टीसीएस, रॅलिज इंडिया, टाटा एलेक्सी, व्होल्टास अशा १४-१५ कंपन्यांचा समावेश आहे. देशाच्या औद्योगिक विकासात, प्रगतीमध्ये टाटा समूहाचा मोलाचा वाटा आहे. त्याकाळात केवळ भारतीय आहे म्हणून प्रवेश नाकारल्या गेलेल्या एका हॉटेलच्या घटनेवरुन भारताचा अभिमान असणारे समुद्रकिनार्‍याजवळील हॉटेल ताज हे देखणे शिल्प उभे केलेले जमशेदजी टाटा. त्यांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन पोलाद, वीज निर्मिती, रसायने, मोटारींची निर्मिती, ग्राहकपयोगी उत्पादने, सेवा, माहिती तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात टाटांचा वेगळा ठसा उमटवलेला आहे.

शापूरजी पालनजी ही देशातील बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. मुंबईत अनेक देखण्या इमारती, सेंट्रल रेल्वे स्थानक, रिझर्व्ह बँकेची जुनी इमारत उभी करण्यात त्यांचे योगदान. मिस्त्री कुटुंब हे टाटांसारखेच मुंबईतील नामवंत, गडगंज संपत्ती असलेले पारसी कुटुंब. त्यांच्याकडे टाटा सन्सचे आज १८.४ टक्के भाग भांडवल आहे. टाटांना जेव्हा आर्थिक अडचणी आल्या तेव्हा शापुरजी पालनजी म्हणजे मिस्त्री कुटुंबाने मदतीचा हात दिलेला आहे. म्हणूनच २०१२मध्ये जेव्हा टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन रतन टाटा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी आपण होऊन मिस्त्री कुटुंबाचे योगदान लक्षात घेऊन सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावर नियुक्त केले. रतन टाटा यांच्या अनेक अडचणींच्या प्रसंगी शापूरजी पालनजी यांनी मदत केली, सहकार्य केले. त्यांची कर्जे फेडली. टाटा समूहातील अनेक कंपन्यांची भांडवली मूल्यांची बाजारास लक्षणीय घसरण झाली. त्याकाळातही एसपी समूहाचा त्यांना पाठिंबा लाभलेला होता.

मात्र ऑक्टोबर २०१६मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली व तेव्हापासून रतन टाटा-सायरस मिस्त्री यांच्यातील मतभेदांची दरी वाढत जाऊन त्याची परिणती न्यायालयाचा मार्ग अवलंबिण्यात झाली. रतन टाटा यांना सायरस मिस्त्रींच्या एकूण कामगिरीबाबत समाधान नव्हते. त्यांची नाराजी होती. टाटा सन्सचे मोठे भागधारक रतन टाटा व त्यांचे कुटुंबिय आहेत. त्यांना टाटा सन्सचे नियंत्रण स्वत:कडे असणे योग्य वाटत होते. त्यातूनच सायरस मिस्त्रींची हकालपट्टी झाली व त्यांच्या जागी टीसीएसचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन यांची वर्णी लागली. त्यानंतर चंद्रशेखरन यांनी जे काही व्यावसायिक निर्णय घेतले त्यात मिस्त्रींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण जरी मिस्त्री टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन खाली उतरवण्यात आले तरी आजही ते टाटा समूहाच्या वर उल्लेख केलेल्या कंपन्यांपैकी टाटा स्टील, टाटा मोटर्स व टीसीएस या कंपन्यांचे अध्यक्ष आहेत. त्यांचे निर्णय टाटा सन्सने बदलले, फिरवले. दरम्यान शापुरजी पालनजी कंपनीही अनेक उद्योगात, व्यवसायात आहे. त्यांच्या काही कंपन्यांची आर्थिक स्थिती अडचणीत असून अनेक कंपन्यांवर कर्जाचा डोंगर आहे. त्यासाठी मिस्त्री यांनी टाटा सन्समधील काही भागभांडवल सुरक्षा म्हणून कर्जांसाठी दिले होते. त्याला टाटा सन्सने विरोध करुन तो व्यवहार करण्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर अद्याप निर्णय झाला नसून तो या महिन्याच्या अखेर कदाचित होऊ शकेल. दरम्यान रतन टाटा व सायरस मिस्त्री यांच्यात आता विविध कंपन्यांमधील भाग भांडवलांवरुन,त्याची खरेदी विक्री करण्यावरुन वादविवाद सुरु झाले असून ते आता विकोपास जाऊ लागले आहेत. दोन्ही व्यक्तिमत्वे खरे तर खूप मोठी आहेत. मात्र असे जाणवते की दोघांनीही आता सामंजस्याचे, समझोत्याचे मार्ग बंद केलेले असून केवळ व्यक्तिगत दृष्टिकोनापोटी न्यायालच्या चव्हाट्यावर वादांचे प्रदर्शन होऊ लागले आहे. दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा म्हणजे भागधारकांचा तोटा व्हायला लागला आहे.

टाटा सन्सचे आज रतन टाटा हंगामी अध्यक्ष आहेत. त्यांच्यात व सायरस मिस्त्रींमध्ये गेल्या काही महिन्यात वृत्तपत्रे, प्रसार माध्यमे व न्यायालयांच्या माध्यमातून युद्ध सुरु आहे. एकमेकांवर कायद्यातील विविध तरतुदींचा कीस काढला जात आहे. मोठमोठ्या वकिलांच्या फौजा उभय बाजूंनी लढत आहेत. अध्यक्षपदावरुन झालेली उचलबांगडी सायरस मिस्त्री यांच्या जिव्हारी लागलेली आहे. ते आता माघार घेतील अशी शक्यता धुसर आहे. दुसरीकडे एकमेकांच्या नियुक्त केलेल्या विश्वस्त पदावरील काढण्यासारखे प्रकार टाटा सन्स व त्यांच्या विविध चॅरिटेबल ट्रस्टमध्ये घडत आहेत. एकंदरीत दोघांमधील संबंध संपुष्टात येऊन त्यास आता ‘युद्धा’चे स्वरुप आलेले आहे.

या दोन दिग्गज नेतृत्वांमधील वादविवादाचा परिणाम आता टाटा सन्सबरोबरच विविध टाटा कंपन्यांच्या व्यवस्थापनांवर हळूहळू व्हायला लागलेला आहे. अनेक कंपन्यांचे बाजारपेठेतील भांडवली मूल्य कमी झालेले आहे. काही कंपन्या तोट्यात आहेत. भागधारकांच्या मनात चलबिचल सुरू झालेली आहे. टाटा समूहात गुंतवणूक करणार्‍या परदेशी वित्त संस्था, स्थानिक वित्त संस्था, म्युच्युअल फंड यांच्या मनात काहीशी साशंकता निर्माण होताना दिसत आहे. सर्वसामान्यांना या वादात फारसा काही रस नसला तरी मात्र हा वाद व्हायला नको होता. सामंजस्याने, चर्चेेने, एकमेकांना समजाऊन घेऊन, क्षमाशील होऊन वाद मिटवण्यात टाटा समूहाचे निश्चित भले आहे. अर्थात दोन्ही व्यक्तिमत्वे सुजाण आहेत. त्यांना कोण समजाऊन सांगणार असाच प्रश्न सध्या निर्माण झाला असून ही परिस्थिती चांगली नाही एवढे मात्र खरे.