Goan Varta News Ad

शेतकर्‍यांमध्ये असंतोष; पंजाब, हरयाणात पडसाद

- महामार्गावर आंदोलन; पोलिसांकडून बळाचा वापर

Story: हरयाणा : |
21st September 2020, 12:47 Hrs
शेतकर्‍यांमध्ये असंतोष; पंजाब, हरयाणात पडसाद

हरयाणा : राज्यसभेत कृषिसंबंधी विधेयके मंजूर होताच शेतकर्‍यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. पंजाबमध्ये युथ काँग्रेसच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शेतकर्‍यांनी पंजाब-हरियाणा सीमेवर अंबाला-मोहाली महामार्गावर उभारलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा तसेच पाण्याचा मारा करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिल्यापासूनच हरियाणा सरकारने सुरक्षेत वाढ केली होती. शेतकर्‍यांनी रविवारी दुपारी १२ ते ३ दरम्यान हायवे अडवण्याचा इशारा दिला होता. शेजारी राज्यांमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्येही अलर्ट देण्यात आला होता.

 आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. अनेकजण ट्रॅक्टर घेऊन आले होते. यावेळी विधेयकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास तीन तास आंदोलन सुरू होते. राज्यातील तसेच राष्ट्रीय महामार्गावरील नाकाबंदी उठवण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.