Goan Varta News Ad

आणखी ९ जणांचा मृत्यू

नवे ४०७ रुग्ण; ५३७ करोनामुक्त

|
21st September 2020, 12:25 Hrs
आणखी ९ जणांचा मृत्यू

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : राज्यात नवे करोनाबाधित मिळण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४०७ बाधितांची भर पडली. ५३७ रुग्ण करोनामुक्त झाले. नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा आकडा वाढल्याने ती काहीशी समाधानाची बाब ठरली आहे. राज्यात आतापर्यंत २८,४२९ बाधित मिळाले आहेत. त्यांपैकी २२,२९७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५,७८१ सक्रिय रुग्ण आहेत. बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ७८.४३ टक्के आहे. आतापर्यंत करोना बळींची संख्या ३५१ झाली आहे. 

रविवारी मृत्यू पावलेल्या ९ पैकी ८ जणांचे गोमेकॉत, तर मडगावच्या कोविड इस्पितळात एकाचे निधन झाले. मृत्यू पावलेल्यांपैकी दोघांना गंभीर आजार नव्हते; परंतु हॉस्पिटलमध्ये उशिरा दाखल केल्याने त्यांच्यावर उपचारांचा परिणाम झाला नाही. दाखल केल्यानंतर केवळ दहा तासांत त्यांचा मृत्यू झाला. चांदोर येथील ५८ वर्षीय महिला, तर चोडण (४९), मंडुर (५६), आगशी (६२), वास्को (६५), असोल्डा (५१), वाळपई (७३), थिवी (६८), खारेबांद (८६) येथील पुरुषांचे रविवारी निधन झाले. उत्तर गोव्यात ५४५ पैकी २१७, तर दक्षिण गोव्यात १००६ पैकी ४९३ खाटा रिकाम्या आहेत.

ऑगस्टपेक्षा सप्टेंबर महिन्यात मोठ्या संख्येने बाधित मिळत आहेत. दररोज सरासरी ८ ते ९ रुग्णांचा मृत्यू होत आहे. बरे होणार्‍या रुग्णांपेक्षा नवे बाधित मिळण्याची संख्या अधिक आहे. रविवार मात्र याला अपवाद ठरला. आतापर्यंत मडगावात सर्वाधिक ४६०, त्यानंतर साखळीत ४४० बाधित आहेत. वास्कोत ३००, फोंड्यात २९७ याशिवाय डिचालीत २२४, पेडणे २३६, वाळपई २५९, म्हापसा २५०, पणजी ३४३, पर्वरी ३६२ बाधित आहेत. दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात बाधितांची संख्या अधिक आहे.