Goan Varta News Ad

रेल्वे दुपदरीकरण : वन्यजीव मंडळाने प्रस्ताव पुढे ढकलला

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून मागवला अहवाल

|
15th September 2020, 08:09 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : मोले येथील झाडांची मोठ्या संख्येने कत्तल केल्यामुळे वादात सापडलेला साऊथ वेस्टर्न रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पाला अद्याप केंद्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता मिळालेली नाही. ३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मंडळाने राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या अहवालानंतरच या प्रकल्पाबाबत चर्चा करण्याचे ठरवून सध्या तरी तो पुढे ढकलला आहे.

जुलैमध्ये प्रस्तावित राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत चर्चा झालेल्या विषयांची माहिती प्राप्त झाली आहे. बैठकीत साऊथ वेस्टर्न रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव आला होता. परंतु राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने आपला अहवाल दिलेला नसल्यामुळे हा प्रकल्प पुढे ढकलण्याचे मंडळाने ठरवले. बैठकीत व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी पंधरा दिवसांत अहवाल दिला जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर पुढील बैठक झालेलीच नाही. 

प्रकल्पासाठी १०.५४ हेक्टर जमीन जाते. त्यांतील ९.५४६ हेक्टर जमीन संरक्षित रानक्षेत्रात येते. तसेच संरक्षित क्षेत्राबाहेर ०.००८६ हेक्टर जमीन लागते. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे प्रकल्प मूल्यांकन अहवाल मागितला आहे. हा प्रकल्प १४ वर्षांपासून प्रलंबित आहे, असे रेल विकास निगमचे महाव्यवस्थापक बी. चंद्रशेखर यांनी मागील वर्षी दांडेली वनपाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. या मार्गातील २७० किलोमीटरचा भाग कर्नाटकात आणि ७५ किलोमीटरचा भाग गोव्यात येतो. प्रकल्पाचे काम जेथे अडचणी नाहीत, तेथे सुरू आहे. २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने २०१८ मध्ये घेतली होती हरकत

तिनयघाट-कॅसलरॉक-करंझोळ रेल्वेमार्ग दांडेलीच्या वाघ प्रकल्पातून पुढे जातो. याआधी २०१८ साली राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने या प्रकल्पाला हरकत घेतली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे. आता व्याघ्र संरक्षण प्राधिकरण जो अहवाल देईल, त्यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या तरी या प्रकल्पाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे.