Goan Varta News Ad

गलवान शहिदांना देशाचा सलाम

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे अभिवादन

|
14th August 2020, 08:48 Hrs
गलवान शहिदांना देशाचा सलाम

नवी दिल्ली :
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. ७४ व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल देशवासियांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजेत ज्यांच्या बलिदानाने आपल्या सर्वांना आज स्वतंत्र देशाचे रहिवासी बनवले आहे. यावेळी राष्ट्रपती म्हणाले, आज संपूर्ण देश गालवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना सलाम करत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, सैनिकांच्या शौर्याने हे दाखवून दिले की हल्ल्याच्या कोणत्याही प्रयत्नांना उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. चीनचे नाव न घेता राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, आज संपूर्ण जग मानवतेच्या (करोना व्हायरस) सामोर असणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानाशी संघर्ष करीत आहे व याचा फायदा घेत आपला शेजारी विस्तारवादी कारभार चतुराईने पार पाडण्याचे धाडस करीत आहे. संपूर्ण देश आज गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन करत आहे.
राष्ट्रपतींनी पुढे सांगितले, करोना या महामारीमुळे यावर्षी स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या धामधुमीत होत नाही. कोविड-१९ महामारीच्या आव्हानाचा सामना सरकार प्रभाविपणे करण्याचा प्रयत्न करत आहे. या करोनाविरुद्ध लढ्यात पहिल्या रांगेत असलेल्या सर्व डॉक्टर, परिचारिका व इतर स्वास्थ्य कर्मचाऱ्यांचा देश ऋणी आहे. या ‘करोना योद्ध्यां’मुळे भारताने या वैश्विक महामारीवर नियंत्रण ठेवले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
पश्चिम बंगाल आणि ओडिशाला धडक बसलेल्या 'अम्फान' चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे आमच्या आव्हानांमध्ये आणखी वाढ झाली. या आपत्ती दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथके, केंद्रीय व राज्य संस्था आणि जागरूक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी होण्यास मदत झाली, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
रामनाथ कोविंद यांनी सांगितले, आमचे भाग्य आहे की, महात्मा गांधी आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे मार्गदर्शक होते. संत आणि राजकारणी यांच्यात समन्वय त्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो, ते फक्त भारताच्या मातीतच शक्य होते. या निमित्ताने आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे कृतज्ञतेने स्मरण करतो. त्यांच्या बलिदानामुळे आपण सर्वजण आज स्वतंत्र देशाचे रहिवासी आहोत.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना
रामनाथ कोविंद म्हणाले की, करोना या महामारीचा सर्वात जास्त फटका गरीब आणि रोजंदारीवर असणाऱ्यांना बसला आहे. या संकटाच्या काळात सरकारने अनेक लोककल्याणकारी उपाययोजना केल्या आहेत. संकटाच्या या काळात त्यांना आधार देणे, विषाणूला आळा घालण्याच्या प्रयत्नाबरोबरच अनेक जनकल्याणकारी निर्णय घेतले गेले आहेत. ‘पंतप्रधान गरीब कल्याण’ योजनेची सुरुवात करून सरकारने कोट्यवधी लोकांना उदनिर्वाहची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही कुटुंबाला उपाशी राहण्याची वेळ येता नये, यासाठी गरजूंना मोफत धान्य दिले आहे. या अभियानामुळे प्रत्येक महिन्याला जवळपास ८० कोटी लोकांना धान्य मिळेल हे सरकारने सुनिश्चित केले आहे.