आलेक्स रेजिनाल्ड यांची आग्रही मागणी
मडगाव : कर्नाटकमध्ये कोळशाची निर्यात करता यावी, यासाठीच राज्यात रेल्वे दुपरीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. या प्रकल्पामुळे वृक्षतोड झाल्यास जैवविविधतेला धोका निर्माण होणार असल्याने रेल्वे दुपरीकरण प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.
राज्यातील कोणताही प्रकल्प हा राज्य सरकारच्या परवानगीशिवाय केवळ केंद्र सरकारच्या सक्तीमुळे होऊच शकत नाही. राज्यातील रेल्वे दुपरीकरणाचा प्रकल्प हा कर्नाटकातील स्टील प्रकल्पांसाठी कोळशाची वाहतूक करता यावी, या एकाच उद्देशाने केली जात आहे. या प्रकल्पामुळे भगवान महावीर अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यान येथील जैवसंपदा धोक्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही २०१३ मध्ये रेल्वे दुपरीकरणाच्या प्रकल्पाला विरोध असल्याचे विधान केले होते. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी हा रेल्वे दुपरीकरणाचा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी रेजिनाल्ड यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
कामत यांचे केंद्रीय पर्यावरण समितीला पत्र
मोले राष्ट्रीय उद्यान, भगवान महावीर अभयारण्या व करमल घाट येथे झाडांची कत्तल करुन रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प, महामार्गाचे रुंदीकरण व वीज वाहिनी टाकण्याच्या कामाला विरोध असल्याबाबत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केंद्रीय पर्यावरण समितीला पत्र पाठवले आहे. या पत्राव्दारे पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा प्रकल्पांना विरोध असेल व पर्यावरण रक्षणासाठी तत्काळ याविषयी कारवाई करण्याची मागणीही कामत यांच्याकडून करण्यात आली आहे.