सर्वांनी बाला देवीचा आदर्श घ्यावा

एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा महिला फुटबॉलपटूंना सल्ला

|
18th May 2020, 10:20 Hrs

नवी दिल्ली :ऑल इंडिया फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी देशातील महिला फुटबॉलपटूंना स्कॉटिश लीग क्लब रेंजर्ससाठी चांगली कामगिरी करणाऱ्या बाला देवीकडून प्रेरणा घेण्यास सांगितले आहे.

मणिपूरची स्ट्रायकर बाला देवीचे रेंजर्सबरोबर व्यावसायिक संबंध आहेत. परदेशी लीग खेळणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे.

प्रत्येक वयोगटातील संघांशी ऑनलाईन संभाषणात पटेल यांनी बाला देवीला सांगितले की, तुझ्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. तू भावी पिढीला मार्ग दाखविला आहे आणि हे देखील सिद्ध केले आहे की, महिला फुटबॉलपटू कुणापेक्षा कमी नाही.

सध्या ग्लासगो येथे असलेल्या बाला देवी म्हणाल्या की, राष्ट्रीय संघाबरोबर खेळल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही २०१८ पासून सतत खेळत आहोत किंवा शिबिरात आहोत. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही परदेशातही बरेच सामने खेळलो ज्यामुळे क्लबकडून करार होण्यास मदत झाली.