पुन्हा पुतळ्याचे राजकारण

सिक्वेरांच्या पुतळ्याचा विषय तापवत ठेवण्यावर त्यांचा भर असेल. कारण यातूनच फातोर्डा मतदारसंघातील दुरावलेले ख्रिस्ती मतदार पुन्हा जवळ येऊ शकतील असे त्यांना वाटते.

Story: अग्रलेख |
12th November 2019, 06:00 am


विषय सोनसडो कचरा प्रकल्पाचा असो, अथवा जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याचा; मडगाव नगरपालिकेचा कारभार बऱ्याचदा वादातच सापडलेला असतो. सोनसडो येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला ओला आणि सुका असा विघटन केलेला कचरा देण्यात मडगाव पालिका अपयशी ठरली. त्यामुळे त्या प्रकल्पाचे काम बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली. मडगावकरांना कचऱ्याच्या दुर्गंधीत राहावे लागले. आता डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्याचा ठराव नगरपालिकेच्या बैठकीत अचानक पुढे आणला गेला. फातोर्ड्याचे आमदार आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या सध्या मडगाव पालिकेत सर्वाधिक आहे. काँग्रेसच्या सदस्यांचे समर्थन घेऊन तेथे गोवा फॉरवर्डच्या बबिता प्रभुदेसाई नगराध्यक्ष बनल्या. परंतु मागील आठवड्यात अचानक सिक्वेरांच्या पुतळ्याचे कारण झाले आणि मडगावचे काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. भाजपच्या नगरसेवकांचाही या प्रस्तावाला विरोध असल्यामुळे प्रभुदेसाई अल्पमतात आल्या आणि त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाही तरी प्रभुदेसाई यांना स्वपक्षातूनही विरोध वाढत चालला होता. त्यांचे नगराध्यक्षपदावरून जाणे जवळपास ठरून गेले होते. बबिता प्रभुदेसाई पदावरून जाता जाता विजय सरदेसाईंच्या नेतृत्वाखालील गोवा फॉरवर्डने सिक्वेरांच्या पुतळ्याचा विषय उपस्थित करून मडगाव-फातोर्डा मतदारसंघांतील ख्रिस्ती मतदारांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यापेक्षा केवळ राजकीय लाभासाठी हा विषय उकरून काढण्यापुरताच त्यांचा हेतू होता हे स्पष्ट झाले.
दिगंबर कामत यांनी आपल्या नगरसेवकांसह वेगळी भूमिका घेतल्यामुळे सरदेसाई यांना या विषयाचे अधिक राजकारण करण्याची संधी मिळाली. परंतु अनेक राजकीय पावसाळे बघितलेल्या कामत यांनी सिक्वेरांच्या पुतळ्याला आपला विरोध नसून ज्या तऱ्हेने विषय पुढे आणला गेला त्या बेकायदा पद्धतीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केल्यामुळे आता पुतळ्याची बाजू मांडणाऱ्यांची अडचण झाली आहे. या गडबडीत गोवा फॉरवर्ड एका बाजूला तर काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक एकत्रितपणे त्यांच्या विरोधात असे आश्चर्यजनक राजकीय चित्र मडगावात तयार झाले! मडगावचा नवीन नगराध्यक्ष निवडताना आपला उमेदवार निवडून आणावयाचा असेल तर सरदेसाईंना काँग्रेस-भाजप गोटातील दोघांना तरी फोडावे लागेल. उलट काँग्रेस-भाजप गट एकसंघ राहिला तर त्यांचा नगराध्यक्ष बहुमताने निवडून येऊ शकेल. मात्र नगराध्यक्षपदासाठी उमेदवार भाजपचा असेल की काँग्रेसचा याचा निर्णय त्यांना आधी करावा लागेल. हा निर्णय जर सहमतीने झाला तर विजय सरदेसाईंना मडगाव नगरपालिकेवरील सत्ता गमवावी लागेल. अर्थात ती सत्ता गमवावी लागली तरी सिक्वेरांच्या पुतळ्याचा विषय तापवत ठेवण्यावर त्यांचा भर असेल. कारण यातूनच फातोर्डा मतदारसंघातील दुरावलेले ख्रिस्ती मतदार पुन्हा जवळ येऊ शकतील असे त्यांना वाटते. त्यामुळे हा विषय मडगाव नगरपालिकेचा नाही, किंवा सिक्वेरांच्या पुतळ्याचाही नाही; तो आहे फातोर्डामध्ये जम बसविण्याचा!